अर्थसंकल्पाचे गोवा चेंबर ऑफ कॉमर्सकडून स्वागत - मनोज काकुलो
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 08:26 PM2019-07-18T20:26:08+5:302019-07-18T20:26:20+5:30
उद्योगांचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या गोवा चेंबर ऑफ कॉमर्सने राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना सरकारच्या डिजिटायझेशन योजनेचे स्वागत केले आहे
पणजी - उद्योगांचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या गोवा चेंबर ऑफ कॉमर्सने राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना सरकारच्या डिजिटायझेशन योजनेचे स्वागत केले आहे.
अध्यक्ष मनोज काकुलो यांनी असे म्हटले आहे की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या या पहिल्याच अर्थसंकल्पात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ह्यसबका साथ, सबका विकासह्ण तसेच दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची समाजकल्याणासाठीची कटिबध्दताही दिसून येते.
अर्थसंकल्पात उद्योगांसाठी प्रत्यक्ष काही दिलेले नसले तरी सार्वजनिक बांधकाम खाते, जलस्रोत खाते, वीज वितरण सुधारणा, अपारंपरिक ऊर्जा, आरोग्य तसेच उच्च शिक्षणासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे त्याचा लाभ उद्योगांना होईल. लाडली लक्ष्मी, गृहआधार यासारख्या कल्याणकारी योजना चालू ठेवण्याचा तसेच सर्व खात्यांचे डिजिटायझेशन, भू नोंदींचे डिजिटायझेशन करुन प्रत्येक तालुक्यात ते उपलब्ध करण्याचे पाऊल स्वागतार्ह आहे.
२४ तास पिण्याची पाणी देण्याचा प्रयत्न, गोमेकॉत सुपरस्पेशालिटी सुविधा, नवी इस्पितळे, अंगणवाडींसाठी नव्या इमारती ही चांगली पावले आहेत. वीज वितरणात सुधारणा करण्याचा संकल्प व त्यादृष्टीने गॅस इन्सुलेटेड उपकेंद्रे स्थापन करण्याचा निर्णय, तांत्रिकी उच्च शिक्षण अभ्यासक्रमात सुधारणा, कौशल्य विकास आदी पावले स्वागतार्ह आहेत.
आर्थिक विकासाच्या माध्यमातून समाज कल्याणाप्रती कटिबध्दताही या अर्थसंकल्पातून दिसून येते, असे काकुलो यांनी शेवटी म्हटले आहे.