गोवा : म्हादईप्रश्नी मुख्यमंत्र्यांकडून म्हादई बचाव अभियानाच्या नेत्याशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 01:08 PM2017-12-21T13:08:49+5:302017-12-21T13:13:46+5:30
कर्नाटक राज्याला पिण्याचे पाणी वापरण्यासाठी द्यावे पण ते केवळ म्हादईच्या खो-यातच वापरले जात असेल तरच मान्यता द्यावी, अशा प्रकारची भूमिका गोवा सरकार हळूहळू घेऊ लागले आहे.
पणजी : कर्नाटक राज्याला पिण्याचे पाणी वापरण्यासाठी द्यावे पण ते केवळ म्हादईच्या खो-यातच वापरले जात असेल तरच मान्यता द्यावी, अशा प्रकारची भूमिका गोवा सरकार हळूहळू घेऊ लागले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी सकाळी गोव्यातील म्हादई बचाव अभियानाचे सचिव राजेंद्र केरकर यांच्याशी कर्नाटकच्या मागणीबाबत चर्चा केली.
गेली अनेक वर्षे कर्नाटक राज्यासोबत गोवा सरकार पाणीप्रश्नी भांडत आहे. कर्नाटक राज्याने म्हादई नदीवर अनेक धरणे बांधून शेतीसाठी पाणी वळविण्याची योजना कागदोपत्री आखली आहे. त्याचबरोबर कर्नाटकच्या काही भागांना पिण्यासाठीही पाणी हवे आहे. गेली अनेक वर्षे पाणी तंटा लवादासमोर म्हादईचा प्रश्न असून तिथे सुनावणी सुरू आहे. म्हादई पाणीप्रश्नी सध्या लवादासमोर महाराष्ट्र व कर्नाटक राज्य एकाबाजूला आणि गोवा राज्य विरुद्ध बाजूला अशी स्थिती आहे.
कर्नाटक राज्याने आपल्याला पिण्यासाठीच पाणी द्या, अशी मागणी नव्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना साकडे घालून केली. गोवा सरकारला कर्नाटकने पत्रही लिहिले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे बुधवारी शहा यांना भेटले व त्यांनी म्हादईप्रश्नी झालेल्या विविध राजकीय नेत्यांच्या बैठकीतही भाग घेतला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर बुधवारी रात्री गोव्यात परतले. गुरुवारी सकाळी त्यांनी म्हादई बचाव अभियानाचे नेते राजेंद्र केरकर यांच्याशी चर्चा केली. गेली अनेक वर्षे केरकर यांनी म्हादई पाणीप्रश्नाचा सखोल अभ्यास केला आहे. गोवा सरकार जागे होण्यापूर्वी पंधरा वर्षापासून केरकर, निर्मला सावंत, डॉ. नंदकुमार कामत आदी पर्यावरणप्रेमी म्हादई पाणी तंटाप्रश्नी चळवळ व जागृती करत आले आहेत.
केरकर यांच्याशी मुख्यमंत्र्यांची बोलणी झाली तेव्हा केरकर याना सरकार कोणता निर्णय घेऊ शकते याची कल्पना आली. आम्ही पिण्यासाठी कर्नाटकला पाणी देण्यासाठी यापूर्वीही कधी विरोध केला नव्हता, अशी भूमिका आता गोवा सरकार घेऊ लागले आहे. म्हादई पाणीप्रश्नी गोवा सरकारची भूमिका मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गुरुवारी सायंकाळर्पयत कर्नाटक राज्याला कळवणार आहेत. लवादासमोर जो तंटा सुरू आहे, तो सुरूच राहील. त्याबाबत गोवा सरकार तडजोड करणार नाही. तसेच म्हादईच्या नदीचे पाणी दुस:या नदीच्या खो-यामध्ये नेऊ दिले जाणार नाही. म्हादईच्या खो:यात राहूनच जर पिण्यासाठी कर्नाटक राज्य पाणी वापरणार असेल तर त्यासाठी गोवा सरकारचा आक्षेप नसेल, अशी माहिती मिळाली.
राजेंद्र कारेकर