गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी राज्यसभा सदस्यत्व सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 08:25 PM2017-09-04T20:25:32+5:302017-09-04T20:26:24+5:30
पणजी, दि. 4 - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा आता राजीनामा दिला आहे. सभापती प्रमोद सावंत यांच्याकडून पर्रीकर यानी सोमवारी आमदारकीची शपथ घेतली.
मुख्यमंत्री पर्रीकर हे 2014 साली गोव्याचे मुख्यमंत्रीपद सोडून केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून गेले होते. त्यावेळी त्यांना भाजपने उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर पाठवले होते. तथापि पर्रीकर यांनी गेल्या मार्च महिन्यात संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला व त्यानी पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून सुत्रे हाती घेतली. मात्र पर्रीकर यानी राज्यसभेचे सदस्यत्व सोडले नव्हते. ते त्यांनी आता सोडले आहे.
पर्रीकर यांनी गेल्या आठवड्यात पणजी मतदारसंघातून विधानसभेची पोटनिवडणूक लढवली आणि ते आमदार म्हणून निवडून आले. त्यामुळे त्यांनी आता राज्यसभा सदस्यत्व सोडले आहे.
सभापतींनी सोमवारी पर्रीकर याना व आरोग्य मंत्री विश्वजित राणे यानाही आमदारकीची शपथ दिली. पर्रीकर हे सलग सहावेळा आमदार म्हणून पणजीहून निवडले गेले आहेत.