...म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर मंत्रालयात आले नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 01:43 PM2018-09-10T13:43:05+5:302018-09-10T13:43:11+5:30
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तरी पर्वरी येथील मंत्रालयात आले नव्हते. अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेऊन गेल्या गुरुवारी गोव्यात दाखल झालेले मुख्यमंत्री पर्रीकर हे शुक्रवारी मंत्रालयात येऊ शकले नाहीत.
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तरी पर्वरी येथील मंत्रालयात आले नव्हते. अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेऊन गेल्या गुरुवारी गोव्यात दाखल झालेले मुख्यमंत्री पर्रीकर हे शुक्रवारी मंत्रालयात येऊ शकले नाहीत. ते सोमवारी सकाळी मंत्रालयात येतील असे सांगितले गेले तरी, प्रत्यक्षात ते सकाळी आले नाहीत. गोव्यात असतानाही मंत्रालयात येण्यापासून मुख्यमंत्री कधीच दूर राहिले नव्हते. पण यावेळी त्यांना आरोग्याच्या कारणास्तव काळजी घ्यावी लागत आहे. मात्र मुख्यमंत्री गोव्यात असल्याने सर्व राजकीय अफवा तूर्त थांबल्या आहेत.
मुंबईतील लिलावती इस्पितळात उपचार घेतल्यानंतर मुख्यमंत्री मग अमेरिकेला उपचारांसाठी गेले होते. तिथे आठवडाभराच्या उपचारानंतर मुख्यमंत्री गोव्यात आले व प्रथम तीन दिवस त्यांनी विश्रांती घेतली. मुख्यमंत्री शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस दोनापावल येथील आपल्या निवासस्थानीच राहीले. मुख्यमंत्री थकलेले आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोणत्याच शासकीय फाईल्स पाठविल्या गेल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांनी विश्रांती घेऊ द्या, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिका-यांनीही घेतली.
शनिवार व रविवारी सुटीचेच दिवस असतात. सोमवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री मंत्रालयात येतील असे अन्य मंत्र्यांना अपेक्षित होते पण ते येऊ शकले नाहीत. मुख्यमंत्री घराकडूनच तूर्त शासकीय काम करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. अमेरिकेहून परतल्यानंतर मुख्यमंत्री कोणत्याच खात्याची किंवा वरिष्ठ अधिका-यांची बैठक घेऊ शकलेले नाही. सोमवारी दुपारनंतर जर ते मंत्रालयात आले तर बैठक घेतील.
मंत्रिमंडळातील अन्य दोन ज्येष्ठ मंत्री गेले काही महिने गोव्याबाहेरच उपचारांसाठी आहेत. नगर विकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे अमेरिकेतील इस्पितळात उपचार घेत आहेत. मुख्यमंत्री पर्रीकर हे न्यूयॉर्कमधील ज्या स्लोन केट्टरींग फाऊंडेशन इस्पितळात उपचार घेत होते, त्याच इस्पितळात मंत्री डिसोझा हेही उपचार घेत आहेत. या शिवाय गोव्याचे वीज मंत्री पांडुरंग मडकईकर हे गेले तीन दिवस मुंबईतील एका खासगी इस्पितळात उपचार घेत आहेत. डिसोझा व मडकईकर या दोन्ही मंत्र्यांकडून एकूण सहा खात्यांचा कारभार सध्या मुख्यमंत्रीच सांभाळत आहेत. या शिवाय मुख्यमंत्र्यांकडे स्वत:ची आणखी 20-22 खाती आहेत.