म्हादई प्रश्नी न्यायालयीन कक्षेबाहेर वाटाघाटींची शक्यता गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी फेटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 12:55 PM2019-09-12T12:55:48+5:302019-09-12T12:56:13+5:30
म्हादई पाणी तंटा लवादाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये निवाडा देऊन पाणीवांटप निश्चित केले होते.
पणजी : म्हादई प्रश्नी न्यायालयीन कक्षेबाहेर वाटाघाटींची शक्यता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी फेटाळून लावली आहे. तसा प्रश्नच नसल्याचे सावंत म्हणाले. म्हादईचे पाणी कर्नाटकने बेकायदेशीररित्या वळविल्याचा गोवा सरकारचा आरोप असून या प्रश्नावरुन उभय राज्यांमध्ये वाद आहे.
लवादाने पाण्याचा जो वाटा कर्नाटकला दिला आहे त्यापेक्षा अधिक पाणी कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकला वळवू दिले जाणार नाही, असे सावंत यांनी स्पष्ट केले. न्यायालयीन कक्षेबाहेर तडजोड करणार नाही, असे ते म्हणाले.
केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी नुकतेच गोवा भेटीवर आले असता म्हादईच्या प्रश्नावर कर्नाटक व गोवा सरकारने आपापसात चर्चा करुन तोडगा काढावा, असे सूचविले होते. मात्र त्याचबरोबर दुसरीकडे विरोधी काँग्रेस पक्षाने अशा कोणत्याही वाटाघाटींना तीव्र विरोध दर्शविला होता. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचे असे म्हणणे होते की, ‘म्हादईच्या बाबतीत आंतरराज्य पाणी तंटा लवादाने आधीच आपला निवाडा दिलेला आहे. एकदा लवादाने पाणीवांटप जाहीर केल्यानंतर तडजोडी किंवा वाटाघाटींना कोणतीही जाग उरत नाही.’
म्हादई पाणी तंटा लवादाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये निवाडा देऊन पाणीवांटप निश्चित केले होते. त्यानंतर दोन्ही राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लिव्ह पिटीशन (विशेष याचिका) सादर केल्या आहेत.