गोव्याचा नवा मुख्यमंत्री आज ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 02:37 AM2018-09-16T02:37:38+5:302018-09-16T06:28:34+5:30
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त असून राज्यात नेतृत्व बदल करणे अटळ आहे
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त असून राज्यात नेतृत्व बदल करणे अटळ आहे. त्यामुळे भाजपमध्ये नवा नेता निवडीसाठी हालचाली सुरु झाल्या असून नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर रविवारी शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पर्रीकर यांनी यापूर्वीच राजीनाम्याची तयारी दाखवली आहे. राज्यात सरकार भाजपचेच असावे व मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता ताबा वगैरे देण्याचे खेळ आता खेळू नयेत यावर भाजपमध्ये एकमत आहे. भाजपचे आमदार मायकल लोबो यांनी गोवा विधानसभा सभागृहात भाजपच्या आमदारांची संख्या वाढावी म्हणून पुढाकार घेतला आहे. भाजपच्या गाभा समितीच्या (कोअर टीम) काही मोजक्याच सदस्यांची एक गुप्त बैठक शनिवारी पार पडली. तीत खासदार नरेंद्र सावईकर सहभागी होते.
मगोपचे नेते असलेले सुदिन ढवळीकर मंत्रिमंडळात सर्वात ज्येष्ठ आहेत. त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा ताबा सोपविण्यास गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांचा आक्षेप आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली. ढवळीकर यांना मुख्यमंत्री करत असाल तर खुशाल करा पण मी मंत्रीपद स्वीकारणार नाही असे सरदेसाई यांनी राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. गोवा फॉरवर्ड पक्ष भाजपमध्ये विलीन केल्यास तुम्हाला मुख्यमंत्रीपद देण्याच्यादृष्टीने आम्ही श्रेष्ठींशी चर्चा करू, असे पदाधिकाºयांनी सरदेसाई यांना सांगितले. या विषयावर भाजपच्या निरीक्षकांसमोर रविवारी चर्चा होणार आहे.
...तर विजय सरदेसाई मुख्यमंत्री
राज्यात सत्ताकारणाच्या स्पर्धेत गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा, मंत्री विजय सरदेसाई आणि महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे (मगोप) नेते आणि मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यातच मुख्यमंत्रीपदासाठी चुरस आहे. गोवा फॉरवर्ड पक्ष भाजपमध्ये विलिन केला तर सरदेसाई राज्याचे नवे मुख्यमंत्री होऊ शकतात.
मनोहर पर्रीकर एम्समध्ये दाखल
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना शनिवारी दिल्लीत आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स (एम्स) मध्ये दाखल केले आहे. सभापती डॉ. प्रमोद सावंत, उपसभापती मायकल लोबो यांनी शनिवारी सकाळी त्यांची इस्पितळात भेट घेतली. पर्रीकर यांच्याकडे २६ खाती आहेत. त्यापैकी महत्त्वाची अतिरिक्त खाती लवकरच इतर मंत्र्यांना देणार असल्याचे समजते.