Goa: लोकप्रतिनिधी म्हणून या कार्यकाळात स्वच्छ व सुंदर प्रियोळ ला प्राधान्य - मंत्री गोविंद गावडे
By आप्पा बुवा | Published: June 12, 2023 07:37 PM2023-06-12T19:37:03+5:302023-06-12T19:37:11+5:30
Goa: कचरा निर्मूलनावर आज कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत. हे रुपये खरे तर नागरिकांच्या हक्काचे आहेत जे इतर विकासात्मक कामाला वापरायला मिळतील जर कचराच तयार नाही झाला तर. असे मत क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी व्यक्त केले .
फोंडा - स्वच्छ व सुंदर प्रियोळ ही संकल्पना घेऊन या कार्यकाळात पुढे जात असून, आपला परिसर स्वच्छ ठेवायची जबाबदारी ही एकट्या सरकारची नसून, प्रत्येकाने आपण आपला परिसर स्वच्छ ठेवणार अशी शपथ घ्यायला हवी. पाश्चात्य देशात स्वच्छतेवर एवढा कटाक्ष असतो मग आम्ही भारतीय त्यात मागे का राहूया. कचरा निर्मूलनावर आज कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत. हे रुपये खरे तर नागरिकांच्या हक्काचे आहेत जे इतर विकासात्मक कामाला वापरायला मिळतील जर कचराच तयार नाही झाला तर. असे मत क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी व्यक्त केले .
वेलिंग पंचायतीच्या वतीने बायोगास प्रकल्प सोमवारी त्यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच हर्षा गावडे ,पंचायतीचे उपसंचालक प्रसिद्ध नाईक, गटविकास अधिकारी अश्विन देसाई, उपसरपंच रुपेश नाईक, इतर पंच सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की उघड्यावर कचरा टाकण्यावर अंकुश यावा म्हणून सरकारने नवीन कायदा चालीस लावायचे ठरवले असून ह्या कायद्याच्या अंतर्गत एक पंच सदस्य सुद्धा कचरा टाकणाऱ्या वर कारवाई करू शकतो. नागरीक सुसंस्कारी झाले असते तर सदरचा कायदा लावायची पाळी सरकारवर आलीच नसती.
गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात टाकण्यात आलेल्या दारूच्या बाटल्या संदर्भात ते म्हणाले की ज्यावेळी गृहमंत्री अमित शहा आले होते त्यावेळेस सगळा परिसर स्वच्छ करण्यात आला होता. परंतु काही दिवसाच्या नंतर पुन्हा एकदा जागोजागी दारूच्या बाटल्यांचे खच पडलेले असून, आम्ही पोलिसांना ह्या बाबतीत सक्त होण्याचे आदेश दिलेले आहेत. यापुढे सदर परिसरात दारूच्या बाटल्या टाकणाऱ्या लोकांवर पोलीस कडक कारवाई करतील.
शिक्षित लोकांवर ताशेरे ओडताना ते म्हणाले की ग्रामीण भागातील लोकांना आपल्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हे ज्ञान असते .परंतु जे स्वतःला शिकलेले आहेत असे समजतात ते शहरी भागातील लोक मात्र मिळेल तिकडे कचरा टाकून परिसर विद्रूप करण्याचे काम करतात.उघड्यावर कचरा टाकताना निदान आपण घेतलेल्या शिक्षणाचा तरी आठवण केली तरी खूप होईल.
कचऱ्याच्या बाबतीत लोक करत असलेली बेजबाबदारपणा पाहता सरकारचा सुद्धा सहनशक्ती संपलेली असून आता सरकार सुद्धा कठोर होणार आहे.