मुख्यमंत्री पर्रीकर घरून करतायेत महत्त्वाची कामं, सोमवारी कार्यालयात येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 12:07 PM2018-02-23T12:07:01+5:302018-02-23T12:09:39+5:30
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे तूर्त दोनापावल येथील आपल्या निवासस्थानामधूनच काम करत आहेत.
पणजी : मुंबईमधील लिलावती इस्पितळातून आठवडाभर उपचार घेऊन गुरुवारी अचानक गोव्यात दाखल झालेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे तूर्त दोनापावल येथील आपल्या निवासस्थानामधूनच काम करत आहेत. तिथूनच ते शासकीय फाईल्स हातावेगळ्या करण्याची प्रक्रिया पार पाडत आहेत. ते येत्या सोमवारी कार्यालयात येतील, असं शासकीय सुत्रांकडून समजतं आहे.
इनफेक्शन टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना प्रवास व वाहतूक टाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. कार्यालयात येऊन काम सुरू केल्यास कर्मचारी तसेच लोकांशी संपर्क येऊ शकतो. तूर्त संपर्क मर्यादित ठेवण्यास डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी दोनापावल येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहणं पसंत केलं आहे. पणजीहून अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर दोनापावल येथे पर्रीकर यांचे निवासस्थान आहे. तिथेच सरकारी फाईल्स तूर्त पाठविल्या जात आहेत. मुख्यमंत्री तिथून काम करत आहेत, असे त्यांच्या कार्यालयातीलही एका अधिकाऱ्याने लोकमतला सांगितले. शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस तरी मुख्यमंत्री दोनापावल येथे राहतील. सोमवारपासून ते कार्यालयात येतील. म्हणजे सोमवारपासून पूर्ण पद्धतीने त्यांचे शासकीय काम सुरू राहिल. सध्याही कामात पूर्ण खंड पडलेला नाही पण घरी राहिल्याने त्यांना थोडी विश्रंती मिळत आहे. मुख्यमंत्र्यांकडे एकूण 23 खाती आहेत. त्यापैकी दहा खाती ही जास्त महत्त्वाची आहेत. बहुतेक फाईल्स ह्या अर्थ खात्याशी व गृह खात्याशी संबंधित असतात. तातडीच्या फाईल्स दोनापावल येथे र्पीकरांकडे पाठवून दिल्या जात आहेत. फाईल्स वाचून त्यावर योग्य तो शेरा मारणो व फाईल हातावेगळी करण्याचे काम पर्रीकर करत आहेत. येत्या बुधवारी मुख्यमंत्री मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची शक्यता काही मंत्र्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. पर्रीकर रविवारपर्यंत आल्तिनो येथील शासकीय महालक्ष्मी बंगल्यातही येणार नाहीत.
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री पर्रीकर यांना प्रथम पोटात दुखू लागल्याने बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळात उपचार करण्यात आले होते. मग त्यांनी मुंबई येथील लिलावती इस्पितळ गाठले. तिथे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू राहिले. स्वादूपिंडाशीसंबंधित आजारामुळे मुख्यमंत्र्यांना लिलावती इस्पितळात रहावे लागले. विधानसभा अधिवेशनाचा कालावधी 22 दिवसांवरून सरकारने चार दिवसांर्पयत खाली आणला. विरोधी काँग्रेस पक्षानेही यासाठी सहकार्य केले. गुरुवारी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. अर्थसंकल्प ज्येष्ठ मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सभागृहाच्या टेबलवर ठेवावा असे प्रारंभी ठरले होते. तथापि, गुरुवारी सकाळी मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज मिळाला व ते दुपारी अडिचच्या सुमारास विधानसभा प्रकल्पात आले. तीन वाजता त्यांनी अर्थसंकल्प मांडला. तत्पूर्वी त्यांनी सर्व मंत्र्यांची बैठक घेतली व येत्या बुधवारी आपण मंत्रिमंडळाची बैठक घेईन अशी कल्पना या मंत्र्यांना दिली.