मनोहर पर्रीकरांची तब्येत खालावली, गोव्यात नेतृत्वबदलाच्या हालचालींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 12:43 PM2018-09-14T12:43:43+5:302018-09-14T12:45:28+5:30
गेले दोन दिवस कलंगुट येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती ढासळल्यामुळे राज्यात नेतृत्वबदल अपरिहार्य बनला आहे.
पणजी - गेले दोन दिवस कलंगुट येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती ढासळल्यामुळे राज्यात नेतृत्वबदल अपरिहार्य बनला आहे. त्याबाबत आढावा घेण्यासाठी भाजपा पक्षश्रेष्ठींचे निरीक्षक बी. संतोष किंवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शनिवारी गोव्यात येण्याची शक्यता आहे.
मनोहर पर्रीकर यांना गुरुवारी(13 सप्टेंबर) सकाळी कलंगुट येथील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. बुधवारी (12 सप्टेंबर) पर्रीकर मंत्रालयात हजर होणार होते. अमेरिकेहून परतल्यानंतर गेले आठ दिवस पर्रीकरांनी मंत्रालयाला भेट दिलेली नाही. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळातील सदस्य, घटकपक्षाचे नेते किंवा भाजपाच्या कोअर कमिटीलाही भेटण्याचं त्यांनी टाळलं आहे.
'पर्रीकरांनी आम्हाला चर्चा करण्यासाठी गुरुवारी त्यांच्या पणजी येथील निवासस्थानी बोलावलं होतं. परंतु, ऐनवेळी त्यांनी सर्व भेटी रद्द केल्या आणि बुधवारपासून ते कुणाशी फोनवरही बोललेले नाहीत', असे मंत्रिमंडळातील एका सदस्याने 'लोकमत'ला सांगितले. भाजपाच्या कोअर कमिटीतही पर्रिकरांच्या अनारोग्यामुळे कमालीची अस्वस्थता आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींशी संपर्क साधून तातडीने नेतृत्वबदल करण्याची मागणी केली आहे. घटकपक्षांमध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व गोवा फॉरवर्ड यांचा समावेश आहे. या पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात नेतृत्वबदल अटळ आहे आणि पक्षश्रेष्ठींचा दूत काय संदेश घेऊन येतोय, याकडे त्यांचंही लक्ष लागलंय.
दरम्यान, विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसनेही राज्यात सरकारस्थापनेच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांचाही एक गट भाजपा पक्षश्रेष्ठींशी संपर्क साधून आहे. ४० सदस्यीय राज्य विधानसभेत भाजपाचे १३, काँग्रेसचे १७, मगोपचे ३, गोवा फॉरवर्डचे तीन आणि उर्वरित अपक्ष सदस्य आहेत.