गोव्यात ३१ मेपर्यंत कर्फ्यू कायम राहणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 03:47 PM2021-05-21T15:47:35+5:302021-05-21T16:02:48+5:30
कर्फ्यूवेळी पूर्वीप्रमाणेच सकाळी सात ते दुपारी एक या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
पणजी : राज्यात सध्या अस्तित्वात असलेला कर्फ्यू हा येत्या दि. ३१ मेपर्यंत कायम असेल असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी येथे जाहीर केले. तसेच कोविडची तिसरी लाट आल्यास ती आल्यास यशस्वीपणे हाताळावी या हेतूने सरकारने पंधरा सदस्यीय टास्क फोर्सची नियुक्ती जाहीर केली आहे.
मंत्रालयात बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्री विश्वजित राणे व महसुल मंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. राज्यव्यापी कर्फ्यूची मुदत परवा २३ रोजी संपुष्टात येत होती पण सध्याची स्थिती पाहता दि. ३१ पर्यंत कर्फ्यू कायम ठेवावा असे ठरले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कोविड नियंत्रणात येत आहे. गोमेकॉ इस्पितळातील ऑक्सीजनचा प्रश्नही सुटला आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. कर्फ्यूवेळी पूर्वीप्रमाणेच सकाळी सात ते दुपारी एक या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली राहतील, असे त्यांनी स्पष्ट
केले.
कोविडच्या तिसऱ्या लाटेवेळी मुलांना त्रास होऊ शकतो असे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. त्यामुळे आम्ही त्याविरुद्ध उपाययोजना सुरू केली आहे. पंधरा सदस्यीय टास्क फोर्सवर सरकारी व खासगी क्षेत्रातील डॉक्टरांना स्थान देण्यात आले आहे. मी स्वत: या फोर्सचा अध्यक्ष असून आरोग्य मंत्रीही त्यावर आहेत. या शिवाय गोमेकोचे डीन डॉ बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ समिती स्थापन केली जाईल. कोविडच्या तिसऱ्या लाटेवेळी कोणत्या नव्या आरोग्य सुविधा उभ्या कराव्या लागतील याविषयी ही समिती शिफारशी करील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
#COVID19 | Goa Chief Minister Pramod Sawant has announced the extension of curfew up to May 31
— ANI (@ANI) May 21, 2021
(File pic) pic.twitter.com/apkzCGorSk
ब्लेक फंगससाठी स्वतंत्र वार्ड
ब्लेक फंगसचे अजूनपर्यंत फक्त सहाच रुग्ण राज्यात आढळले आहेत. त्यापैकी एक रुग्ण हा कोविड व ब्लेक फंगस अशा दोन्ही कारणांमुळे दगावला, असे आरोग्य मंत्री राणे यांनी सांगितले. ब्लेक फंगसच्या रुग्णांसाठी बांबोळीच्या सुपरस्पेशालिटी इस्पितळात स्वतंत्र विभाग तयार केला जाईल. दिल्लीत वगैरे कोविड रुग्ण व ब्लेक फंगसचे रुग्ण यांच्यासाठी वेगळे वार्ड आहेत. तसेच मुलांवरील उपचारांसाठी ६० खाटांचा स्वतंत्र आयसीयू विभाग सुरू केला जाईल, असे राणे यांनी नमूद
केले.
वादळामुळे १४६ कोटींची हानी
दरम्यान, राज्यात जे तोक्ते वादळ येऊन गेले, त्यामुळे एकूण १६४ कोटी रुपयांची हानी झाली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मच्छीमार, शेतकरी, बागायतदार यांचे नुकसान झाले. या शिवाय वीज क्षेत्रातील साधनसुविधा मोडून पडल्या. मच्छीमारांना तीन दिवस मासेमारीसाठी जाता आले नाही, त्या हानीचाही समावेश १४६ कोटींमध्ये केला गेला आहे. लोकांची घरे मोडली, त्याचाही समावेश करण्यात आला आहे. हा सगळा अहवाल आम्ही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठवणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
तेजपालप्रश्नी हायकोर्टात
तरुण तेजपाल यास सत्र न्यायालयाने निर्दोष सोडले असल्याविषयी पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता, हे दु:खद आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. एका महिलेवर अन्याय झालेला असून सरकार त्याविरुद्ध लगेच उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. सत्र न्यायालयाच्या निवाड्याविरुद्ध आम्ही आव्हान याचिका सादर करणारच असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महिलेवरील अन्याय आम्ही सहन करणार नाही असे ते म्हणाले.