मुख्यमंत्री दिल्लीला रवाना; भाजपा अध्यक्षांना भेटण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 01:11 PM2019-10-03T13:11:07+5:302019-10-03T13:11:59+5:30
मुख्यमंत्री शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी गोव्यात परतणार
पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे बुधवारी रात्री उशिरा दिल्लीस रवाना झाले. मुख्यमंत्र्यांकडून दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली जाण्याची दाट शक्यता आहे.
मुख्यमंत्री खूप दिवसांनंतर दिल्लीला गेले आहेत. शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी ते गोव्यात परततील. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी पणजीतील पदयात्रेत भाग घेतला. गांधी जयंती सोहळ्यात सहभाग घेतला. त्यानंतर ते दिल्लीस रवाना झाले. ते दिल्लीला जात असल्याची कल्पना अन्य मंत्र्यांना नव्हती. मात्र मुख्यमंत्र्यांची भेट अचानक ठरली नाही. ती पूर्वनियोजितच होती. लोकमतने मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला असता, मुख्यमंत्री म्हणाले की जागतिक आर्थिक फोरमच्या बैठकीनिमित्ताने आपण दिल्लीस आलो. आणखी कुणाला आपण भेटावे ते अजून ठरलेले नाही.
दरम्यान, भाजपच्या आतील गोटातून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री दिल्लीत शहा यांची भेट घेतील. अलिकडेच गोव्यात नोकर भरतीच्या विषयावरून वाद निर्माण झाला. मुख्यमंत्र्यांनी क वर्गातील सगळी नोकर भरती राज्य निवड आयोगामार्फतच होईल अशी भूमिका घेतली व यामुळे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांना धक्का बसला. कारण आरोग्य खात्याने शेकडो पदे भरण्यासाठी प्रक्रिया आरंभली होती. नोकर भरतीतील आरोग्य मंत्र्यांचे अधिकार कमी झाले. त्यानंतर मंत्री राणे अस्वस्थ झाले व त्यांनी दिल्ली गाठली. त्यांनी तिथे अमित शहा यांची भेट घेतली. आपण शहा यांना भेटल्याचा पुरावा म्हणून राणो यांनी फोटोही प्रसार माध्यमांना पाठवून दिला. मुख्यमंत्री सावंत हे या सगळ्य़ा पाश्र्वभूमीवर अलिकडे दिल्लीला पोहचले नव्हते. आता त्यांना संधी मिळाल्याने ते शहा यांची भेट घेऊनच परततील व त्यांच्यासमोर नोकर भरतीचा विषय मांडतील असे पक्ष सुत्रांनी स्पष्ट केले.