...तर शिवाजी महाराजांमुळे गोवा अगोदरच मुक्त झाला असता, मुख्यमंत्र्यांच्या विधानावर सोशल मीडियात चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 12:50 PM2020-02-20T12:50:43+5:302020-02-20T13:02:20+5:30
गोमंतकीयांचे शिवरायांशी विविध गोष्टींवरून नाते सांगितले जाते. शिवभक्तांची संख्या गोव्यात खूप आहे.
पणजी - शिवाजी महाराजांनी गोव्यातील बहुतांश भाग जिंकले होते पण त्यांना तह करण्यासाठी परत जावे लागले. ते जर परत गेले नसते व त्यांनी पूर्ण गोवा आपल्या अधिपत्त्याखाली आणला असता, तर गोवा तीनशे वर्षे अगोदरच पोर्तुगीजांच्या जाचातून मुक्त झाला असता, असे विधान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर त्यावरून दोन्हीबाजूने चर्चा रंगू लागली आहे.
गोव्यात पोर्तुगीजांची राजवट असताना बरेच अत्याचार झाले. शिवाजी महाराज व संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री सावंत यांनी शिवजयंती सोहळ्य़ावेळी केलेले विधान हे योग्यच ठरते पण सोशल मीडियावरून काहीजणांनी त्याविषयी वेगळी प्रतिक्रिया व्यक्त करणे सुरू केले आहे. काही तरुणांनी शिवाजी महाराज नव्हे तर संभाजी महाराजांनीच गोव्यात पोर्तुगीजांना खरे आव्हान दिले होते, असा दावा केला आहे. संभाजी महाराज गोव्यात आले होते व त्यांनी पोर्तुगीजांशी युद्धच पुकारले होते असा संदर्भ दिला जात आहे. हा संदर्भही वस्तूस्थितीला धरून आहे. शिवाजी महाराजांनी गोव्यातील डिचोली तालुक्यात सप्तकोटेश्वर मंदिराची पुर्नप्रतिष्ठा केली होती. शिवरायांनी डिचोली, सत्तरी, फोंडा आदी काही तालुक्यांमध्ये आपला प्रभाव दाखविला होता. गोमंतकीयांचे शिवरायांशी विविध गोष्टींवरून नाते सांगितले जाते. शिवभक्तांची संख्या गोव्यात खूप आहे. यामुळेच गेल्या पंचवीस वर्षात गोव्यात शिवजयंती साजरी करण्याचे उपक्रम वाढले. त्यातील सहभाग वाढला.
गोव्यात शिवाजी महाराजांचे पुतळे जास्त संख्येने उभे राहतात, पण संभाजी महाराजांचे पुतळे का उभे केले जात नाहीत असाही प्रश्न काहीजण सोशल मीडियावरून उपस्थित करू लागले आहेत. काहीजणांना गोव्यात शिवजयंती मोठय़ा प्रमाणात साजरी होते हे रुचेनासे झाले आहे व त्यामुळेही मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा वेगळा अर्थ लावण्याचाही प्रयत्न काहीजण करू लागले आहेत. दोन्हीबाजूंनी सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली आहे. शिवाजी महाराजांना माघारी जावे लागले नसते तर पोर्तुगीजांच्या राजवटीतून गोवा तीनशे वर्षे अगोदरच मुक्त झाला असता हे मुख्यमंत्र्यांचे विधान चर्चेस कारण ठरले आहे. शिवरायांचा उल्लेख करून काहीजण हिंदू धर्माचीच महती जास्त मोठी करून सांगू पाहतात असेही गोव्यातील काहीजणांना वाटते. त्या काहीजणांनी त्यासाठी स्व. गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तिकेचा संदर्भ देणे सुरू केले आहे. ही पुस्तिका वाचा असे सल्लेही सोशल मीडियावरून दिले जात आहेत. गोव्यातील अनेक शिवप्रेमींनी मात्र मुख्यमंत्र्यांच्या विधानास पाठींबा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Breaking: स्वतः कोर्टात हजर झालेल्या देवेंद्र फडणवीसांना दिलासा; जामीन मंजूर
राम मंदिरासाठी ट्रस्ट बनवली, मग मशिदीसाठी का नाही? शरद पवार यांचा सवाल
तामिळनाडूमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 19 जणांचा मृत्यू
जर्मनीच्या दोन बारमध्ये गोळीबार; ८ जणांचा मृत्यू
कमल हासनच्या इंडियन 2च्या सेटवर भीषण अपघात, तीन ठार