खराब रस्त्यांचा मुद्दा ऐरणीवर, अपघातग्रस्त महिलेला मुख्यमंत्र्यांकडून मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 02:09 PM2019-10-05T14:09:02+5:302019-10-05T14:11:55+5:30
मुख्यमंत्र्यांनी दाखविलेल्या तत्परेबाबतचा व संवेदनशीलतेविषयीची एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पणजी - मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे दाबोळी विमानतळावरून पणजीच्या दिशेने येत असताना जुवारी पुलावर एक पर्यटक महिला अपघात होऊन जखमी स्थितीत पडलेली असल्याचे त्यांनी पाहिले. मुख्यमंत्र्यांनी या अपघातग्रस्त महिलेला मदत केली आहे व उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात पाठविले. उपचारांनंतर महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शुक्रवारी (4 ऑक्टोबर) रात्री ही घटना घडल्याची माहिती मिळते. दिल्ली भेटीवर गेलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत शुक्रवारी रात्री गोव्याला परतले. दाबोळी विमानतळावरून ते येत होते. सुरक्षेसाठी पोलिसांच्या वाहनांचा ताफा मुख्यमंत्र्यांच्या पुढे व मागील बाजूने होता. मुख्यमंत्र्यांनी अपघातग्रस्त महिलेला पाहताच वाहन थांबविण्याची सूचना वाहन चालकाला केली. महिला जखमी झाली होती. मुख्यमंत्र्यांनी तिच्याकडे जाऊन विचारपूस केली. तसेच तिला मग आपल्या ताफ्यातील एका वाहनाद्वारे रुग्णालयात उपचारांसाठी पाठविले गेले. महिला केरळ येथील असल्याची माहिती मिळत आहे. दुसऱ्या एका वाहनाने ठोकर मारून तिला टाकले व ते वाहन निघून गेले. त्या निघून गेलेल्या वाहनाचा क्रमांक माहीत आहे काय हेही मुख्यमंत्र्यांनी महिलेला विचारून पाहिले.
मुख्यमंत्र्यांनी दाखविलेल्या या तत्परेबाबतचा व संवेदनशीलतेविषयीची एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर त्याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री अपघातग्रस्त महिलेला मदत करत असल्याचा व्हिडीओ तेथील एका साक्षीदार व्यक्तीने काढला. तो व्हीडीओ सोशल मीडियावर अपलोड झाला. मुख्यमंत्री सावंत यांनी यापूर्वीही अशा प्रकारे आपले वाहन थांबवून अपघातग्रस्त व्यक्तींना मदत केली आहे. यापूर्वी कुंभारजुवे गवंडाळी पुलावर एक व्यक्ती निर्माल्य प्लास्टीक पिशवीतून नदीत फेकू पाहत होती, मुख्यमंत्र्यांनी त्याहीवेळी आपले वाहन थांबविले व त्या व्यक्तीला नदीत अशा प्रकारे निर्माल्य टाकू नये अशी सूचना केली होती. त्याबाबतचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. दरम्यान, गोव्यातील खराब रस्ते अपघातांना कारण ठरत आहेत याची जाणीवही व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना करून द्यायला हवी, अशी प्रतिक्रिया काही सामाजिक कार्यकर्त्यांनी फेसबुकवरूनच व्यक्त केली आहे.