पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांना स्वयंपूर्ण ई बाजाराच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देणार!

By आप्पा बुवा | Published: October 10, 2023 11:29 PM2023-10-10T23:29:45+5:302023-10-10T23:29:57+5:30

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आश्वासन

Goa CM says To provide market access to traditional businessmen through self-sufficient e-markets | पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांना स्वयंपूर्ण ई बाजाराच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देणार!

पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांना स्वयंपूर्ण ई बाजाराच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देणार!

अप्पा बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: एकेकाळी पारंपारिक व्यवसायावर आमच्या विकासाची आर्थिक चाके फिरत होती. कालांतराने पारंपरिक व्यवसाय मागे पडत चालले आहेत .परंतु पारंपारिक व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य उभे करण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या योजना मांडल्या असून, स्वयंपूर्ण ई बाजाराच्या माध्यमातून मार्केट उपलब्ध करून देण्याचे आव्हान गोवा सरकारने स्वीकारले आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर स्वयंपूर्ण ई बाजार आम्ही प्रत्यक्षात आणत आहोत. असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी दिले.बेतोडा निरंकाल पंचायतीच्या सभागृहाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जलस्त्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर ,पंचायत मंत्री माविन गुदिनो , जी सुडाचे  उपाध्यक्ष आमदार केदार नाईक आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की लोकांना रोजगार निर्माण व्हावे म्हणून आम्ही वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम राबवत आहोत. तुम्ही फक्त सांगा तुम्हाला हवे ते प्रशिक्षण द्यायला सरकार तयार आहे.या प्रशिक्षण योजना च्या माध्यमातून युवकांनी स्वतःला अद्यावत ठेवणे गरजेचे आहे. यापुढे सरकारी नोकरी देताना सुद्धा अनुभव गरजेचा आहे. मग तो अनुभव सरकारी अप्रेंटरशिप मधला असू दे किंवा खाजगी अप्रेंटरशिप मधला असू दे. गावची पंचायत ही विकासाचे मुख्य केंद्र बनले पाहिजे. त्याकरता नावापुरते पंच सदस्य आम्हाला नको तर, 24 तास गावचया विकासाबद्दल विचार करणारे पंच सदस्य आम्हाला हवे आहेत. कारण विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असल्यास आम्हाला सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक आहे.
 सरकार आज विकासाचे स्वप्न घेऊन वेगवेगळे प्रकल्प उभारत आहे. ग्रामीण भागात सुद्धा आज मोठ्या संख्येने सभागृहे बांधण्यात येत आहेत. ह्या प्रकल्पाचा योग्य तो वापर व्हायला हवा.कारण पूर्वीच्या सरकारने काही ठिकाणी प्रकल्प बांधले व त्यांचा उपयोग झाला नाही अशा घटना घडलेल्या आहेत. गावातील कोणताही सरकारी प्रकल्प हा लोकांना आपला वाटला पाहिजे. आपला प्रकल्प म्हणून त्यानी त्याची निगा राखली पाहिजे.
पंचायत मंत्री मावीन गुधीनो यावेळी म्हणाले की' दुर्गम भाग व दुर्बल घटक  डोळ्यासमोर ठेवून आम्ही योजना राबवत आहोत. सामानातल्या सामान्य माणसाचा विकास कसा होईल हे आमचे सरकार पहात आहे. केंद्र सरकारचा सुद्धा गोवा सरकारवर विश्वास आहे म्हणूनच आम्हाला निधी कमी पडू दिला जात नाही . आम्ही फक्त बोलत नाही तर प्रत्यक्षात कृती करून दाखवतो. गाव स्वच्छ राहिला तर गोवा स्वच्छ राहील यासाठी प्रत्येक प्रभागात कचऱ्याचे योग्य ते नियोजन करा. या साठी जो काही पैसा लागेल तो द्यायला सरकार तयार आहे.
 जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यावेळी बोलताना म्हणाले की सरकारी नोकरी पेक्षा जास्त पैसा आज पारंपारिक व्यवसायात आहे. शेती डेरिं सारख्या व्यवसायामधून सुद्धा मुबलक पैसा कमावता येतो हे काही युवकांनी दाखवून दिले आहे. पारंपारिक धंद्याची कास धरून गावचा विकास शक्य आहे. आज सरकारने वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत.  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारी विकासासाठी पैसा कमी पडू देत नाही. शिक्षणामुळे  जसा व्यक्तीचा विकास होतो तसाच गावचा सुद्धा विकास होतो .स्वयंपूर्ण गोवा, स्वयंपूर्ण पंचायत स्वप्नसाठी प्रत्येक नागरिकांनी आग्रह धरावा.
 आमदार केदार नाईक यावेळी बोलताना  म्हणाले की गावा गावांमध्ये प्रकल्प येण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ, सबका विकास ,सबका प्रयास हा मंत्र घेऊन आम्ही मागची दहा वर्षे काम करत आहोत. भविष्यात सुद्धा करत राहू.
डॉ.गौरी शिरोडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सरपंच उमेश गावडे यांनी स्वागत केले .

Web Title: Goa CM says To provide market access to traditional businessmen through self-sufficient e-markets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.