आजचा अग्रलेख: किनारी भागात धुमाकूळच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 10:07 AM2023-03-14T10:07:00+5:302023-03-14T10:07:18+5:30

उत्तर गोव्याच्या किनारी भागात धुमाकूळ सुरूच आहे.

goa coastal areas and crime | आजचा अग्रलेख: किनारी भागात धुमाकूळच

आजचा अग्रलेख: किनारी भागात धुमाकूळच

googlenewsNext

उत्तर गोव्याच्या किनारी भागात धुमाकूळ सुरूच आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका घेऊन पोलिस यंत्रणा अधिक सक्रिय करण्याची गरज आहे. पर्यटकांवर वारंवार हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत. पर्यटकांना लुटलेही जात आहे. पोलिस यंत्रणा याविरुद्ध लढण्यात कमी पडतेय. आमदार मायकल लोबो यांच्या मते तर बार्देश तालुक्याच्या किनारी भागात खंडणीराजही सुरू झाले आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी या विषयात लक्ष घालावे. सरकारमधील कुणाच्या आशीर्वादाने जर खंडणीराज सुरू झाले असेल तर तत्काळ ते बंद करावे, अन्यथा यापुढे गोव्यात हायप्रोफाईल रेस्टॉरंट सुरू करण्यास कुणीच व्यावसायिक पुढे येणार नाही. यातून गोव्याच्या पर्यटनाचे मोठे नुकसान होणार आहे. हणजूण येथे पर्यटकांवर काही जणांनी तलवारी व सुऱ्याने हल्ला केला. संबंधित पर्यटक गंभीर जखमी झाला आहे. याबाबतचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. केवळ गोव्यातच नव्हे तर देशाच्या विविध भागांमध्ये हा व्हिडीओ पोहोचला आहे. राष्ट्रीय दैनिकांतही बातमी झळकली आहे. 

गोव्यात कायद्याचे राज्य आहे की नाही, असा प्रश्न लोक विचारत आहेत. याबाबत चौकशी करून संबंधित पोलिसांना निलंबित केले जाईल, असा इशारा मुख्यमंत्री सावंत यांनी काल दिला. त्यांची भूमिका स्वागतार्ह आहे. मात्र पर्यटकांना छळणे आणि स्थानिक यंत्रणेने रेस्टॉरंट व्यावसायिकांना छळणे हे समांतरपणे गोव्यात चालत आहे. याविरुद्ध व्यापक कारवाई करावी लागेल. पर्यटकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करावी लागेल. एखाद्या पर्यटकावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतरदेखील पोलिस जर गंभीर कलमे लागू करणार नसतील तर ते धक्कादायकच म्हणावे लागेल. केवळ पोलिसांची बदली करून काम होणार नाही. पोलिस यंत्रणा कुणाबाबतच संवेदनशील नाही आणि पोलिसांमध्ये कायद्याची भीतीही राहिलेली नाही. पोलिसांचा वापर नको त्या कामासाठी सरकार करून घेते, त्यामुळे राजकारण्यांचा आशीर्वाद आपल्यावर आहे ही भावना किनारी भागातील अनेक पोलिसांमध्ये निर्माण झालेली आहे. काही रेस्टॉरंटमध्ये पोलिसांना पाठवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न अलीकडे होतोय. हा प्रयत्न कोण करतोय याच्याही मुळाशी मुख्यमंत्र्यांनी जाण्याची गरज आहे.

गोव्याचा खाण धंदा मध्यंतरी दोनवेळा बंद पडला आणि अनेक सामान्य कुटुंबे अडचणीत आली. पर्यटन धंदाही जर बंद पडला तर लाखो लोक बेरोजगार होतील. पर्यटनावरच अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. आपल्या घरातील खोल्या देश-विदेशी पर्यटकांना भाडेतत्त्वावर देऊन अनेक कुटुंबे गुजराण करत आहेत. पर्यटकांमुळे जलक्रीडा, टॅक्सी व्यवसाय, रेस्टॉरंट्स व हॉटेल्स चालतात. पेडणे व बार्देशच्या किनारपट्टीत इज व्यवसाय वाढलाय. त्याचे दुष्परिणाम गोमंतकीय समाजाला भोगावे लागत आहेत. मात्र आता पर्यटकांवर हल्ले, पर्यटकांचे सामान हॉटेलच्या खोल्यांमधून लुटणे, पर्यटकांच्या गाड्या अडविणे अशा पद्धतीनेही सतावणूक सुरू आहे. पर्यटकांची लूट जर सर्वबाजूने होऊ लागली तर पर्यटक अन्यत्र जाणे पसंत करतील. पर्यटकांनी एकदा पाठ फिरवली तर गोव्यावर पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ शकते. हणजूण येथे ९ मार्च रोजी झालेली पर्यटक मारहाणीची घटना खूप गंभीर आहे. हॉटेलमध्ये झालेल्या वादानंतर पर्यटकांना तलवारीने मारले गेले, मात्र पोलिसांनी ३०७ कलम (खुनाचा प्रयत्न) लागू न करता ३२४ कलम लावून संशयित आरोपींना लगेच मोकळे सोडले होते. अनेकदा पर्यटक बिचारे घाबरून तक्रार करायला जात नाहीत. ते गोवा सोडणे पसंत करतात. हीच गोष्ट पोलिसांच्या व आरोपींच्या पथ्यावर पडत आहे.

अलीकडे वाहतूक पोलिस पर्यटकांची गाडी दिसली की, थांबवतात. वेगवेगळी कागदपत्रे मागतात, पैसे उकळतात. यापूर्वी एकदा पर्यटन मंत्री रोहन खंवटे व आमदार लोबो यांनीदेखील अशा प्रकारांविषयी चिंता व्यक्त केलेली आहे. गृहखाते अजूनही पर्यटकांचा छळ थांबवू शकलेले नाही. सावंत सरकार अधिकारावर येऊन याच महिन्याच्या अखेरीस वर्ष पूर्ण होईल. किनारी भागातील धुमाकूळ सरकार थांबवू शकत नसेल तर गोव्याच्या एकूणच प्रतिमेला गालबोट लागेल. मुख्यमंत्री सावंत यांना अधिकाधिक वेळ आता पोलिस दल सुधारण्यासाठी द्यावा लागेल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: goa coastal areas and crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.