प्रासंगिक: व्यथा एका सामान्य पेडणेकराची

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 08:25 AM2023-04-03T08:25:18+5:302023-04-03T08:26:27+5:30

होय... मी एक सामान्य पेडणेकर. मला खूप काही बोलायचं आहे; पण ऐकण्यासाठी माणुसकी शिल्लक राहिली नाही.

goa common pednekar and its agony | प्रासंगिक: व्यथा एका सामान्य पेडणेकराची

प्रासंगिक: व्यथा एका सामान्य पेडणेकराची

googlenewsNext

- ज्ञानेश्वर वरक, कासारवर्णे, पेडणे

होय... मी एक सामान्य पेडणेकर. मला खूप काही बोलायचं आहे; पण ऐकण्यासाठी माणुसकी शिल्लक राहिली नाही. मग बोलणार तरी कोणासोबत? आणि कशासाठी? मी कसा होतो, कसा जगलो, आणि आता काय भोग भोगावे लागत आहेत. कुणाच्यातरी खोट्या थापांना बळी पडल्याची भावना मला सातत्याने सतावत आहे. कधीकाळी मागासवर्गीय आणि विकासापासून वंचित असल्याचा ठपका माझ्यावर बसला होता खरा, पण त्यातच सुख होतं हे आता जाणवू लागलं आहे. माझ्या पेडण्याची भाषा, माझं राहणीमान आणि माझं वागणं मी पेडणेकर असल्याचं गोव्याच्या पातळीवर डोळ्यांना पारखता येत होतं. त्यावेळी मला लोक हिणवायचे तरीही मला कधी शरम वाटली नाही. कारण, मी स्वाभिमानी पेडणेकर होतो.

शेती, जेमतेम व्यवसाय याच्यातच माझ्या पिढ्या संपल्या. गावात जाण्यासाठी रस्त्याची सोय नव्हती तरीही कधी वाटेत अडकून पडलो नाही. शिक्षण नाही म्हणून अक्कल गहाण ठेवली नाही; पण कोणतरी येतं, खोट्या थापा मारतं आणि आम्ही वेडे डोळे झाकून विश्वास ठेवतो. त्यावेळी माझ्याकडे गाडी घोडा व्यवसाय असं काही नव्हतं तरीही मी भाटकार' होतो. स्वतःच्या मालकीची कवडीमोल असो; पण जमीन होती.

पण या माझ्या वंचित सुखी जीवनाला शेवटी कुणाची तरी नजर लागलीच. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. मला विकासाची स्वप्नं दाखविण्यात आली. तसंही आम्हाला कोणी 'पात्रांव' म्हटलं की त्याला खळ्यात कशाला चुलीजवळ बसून जेवण वाढणारे आम्ही. तेच कधीतरी आम्हाला उकिरड्यावर फेकून देतील, असं मात्र वाटलं नव्हतं. माझ्या एकट्याच्या डोक्यात कोणीतरी ते विचार घातले आणि मी ते विचार पेटवत माझ्या इतर पेडणेकरांपर्यंत पोहोचलो. तेवढ्यापुरते ठीक होतं. तसंही माझ्या जमिनीची कवडीमोल किंमत ठरवून मी आधीच मोकळा झालो होतो. त्यामुळे ती एकदाची लाटून हाती पैसा येईपर्यंत मलाही राहवलं नाही. स्वप्नातल्या नगरीत मीही स्वतःला लोटून दिलं. पेट्रोमॅक्सच्या ज्ञानेश्वर कासारवर्णे, उजेडात रात्र घालवणाऱ्याला झगमगणारे दिवे दाखविले की त्याचं काय होणार? मला कोणतरी हिणवतंय याची मला आता लाज वाटायला सुरुवात झाली होती. जाऊद्या म्हटलं हा वेगळेपणाचा ठपका माझ्यावरून निघून तरी जाईल.

या सगळ्याला वाट एकच होती ती म्हणजे पेडणे तालुक्याचा विकास. या विकासाला मी पोटतिडकीनं साथ दिली. कसलाच विचार न करता जमीन दान केली. गावागावांत रस्ते, पाणी, साधन सुविधा पोहोचल्या. माझ्यासाठी तेवढाच विकास पुरेसा होता; पण या विकासाच्या प्रवाहातून बाहेर पडणं मला शक्य झालं नाही. स्वप्नातून जागं होऊन सत्य अजमावताच आलं नाही. आणि शेवटी जे व्हायचं तेच झालं.

पैशाच्या लोभापोटी स्वतःचं घर भाडेकरूंना दिलं. त्या भाडेकरूची हिंमत एवढी वाढली की माझ्याच घरातून मला हाकलून देण्यापर्यंत प्रकरणं पोहोचली. म्हणता म्हणता पेडणे तालुक्यात प्रकल्पांची पायाभरणी होऊन कामाला सुरुवात झाली. आशा होती की मोठी जाऊद्या छोटीशी तरी संधी मिळेल; पण नाही मिळाली. असो. तसंही आम्ही 'पात्रांव' त्यामुळे छोटी मोठी कामं आम्ही नाही करू शकत. आम्ही स्वतःला पात्रांव म्हणत घरीच बसलो आणि त्यांनी मात्र संधी पळवली.

एवढं सर्व होऊनही मी स्वाभिमानी पेडणेकर अजून मात्र गप्प आहे. अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या माझ्या इतर बांधवांनी पोलिसांच्या लाठीची कळ सोसली. टाळके फोडून माझ्या मदतीची आशा व्यक्त केली; पण मी नाही त्यांच्या मदतीला गेलो. कारण त्यावेळी या विकासाच्या प्रवाहात मी नव्हतो बुचकळलो. स्वप्नातल्या नगरीत मी अजूनही स्वप्नच रंगवीत होतो. ही स्वप्नांची नगरी नसून आमच्यावर ओढवलेलं संकट आहे, हे इतरांनी मला सांगण्याचा प्रयत्न केला; पण मी नाही त्यांचं ऐकलं. काहीजण रडले, पण मला नाही त्यांचं दुःख समजलं. हां हां म्हणता सुनसान असलेले रस्ते गाड्यांच्या प्रवाहाने गजबजून गेले. रस्त्याच्या बाजूला उभा राहिलो तरी हॉर्न वाजवू लागले. कधीकाळी पाखरं चिवचिवाट करत उंच आकाशात उडणाऱ्या पठारावर आता विमानं घिरट्या घालू लागली. रात्री नऊ वाजता किण्ण होणारे गाव आता पूर्ण रात्र जागू लागले. रात्र होताच किण्ण काळोख होणाऱ्या पठारावर आता चोवीस तास विजेचे दिवे जळू लागलेत.

तेव्हा कुठेतरी मला जाग आली; पण वेळ मात्र निघून गेली होती. आता सांगणार कुणाला? सरकारला, राजकारण्यांना की कुणाला. राजकारण्यांना सांगण्यासाठी मी जागाच ठेवली नाही. निवडणुकीवेळी पाचशे, हजार रुपये घेऊन मी मतं विकली. मग आता त्यांच्याकडे कुठच्या तोंडानं जाणार? हातचं गमवून भिकारी होऊन बसलो. गाव सोडून जीवनाला कंटाळून इतर ठिकाणी स्थलांतरित होण्यावाचून माझ्याकडे पर्याय राहिला नाही; पण एक मात्र आहे. आता मला कोणी पेडणेकर म्हणून हिणवत नाही. कारण, माझं अस्तित्वच आता शिल्लक राहिलेलं नाही. होय. मी एक सामान्य पेडणेकर,

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: goa common pednekar and its agony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा