Goa: गोव्यात शॅकमालकाने केलेल्या खंडणीच्या आरोपांवरून ‘दक्षता’कडे तक्रार, पर्यटन संचालकांनी पंधरा दिवसात चौकशी अहवाल मागविला
By किशोर कुबल | Published: June 8, 2023 09:15 PM2023-06-08T21:15:32+5:302023-06-08T21:15:46+5:30
Goa: गोव्यात शॅकमालक संघटनेचे पदाधिकारी जॉन लोबो यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी व्हावी यासाठी पर्यटन खात्याने दक्षता खात्याकडे तक्रार केली आहे.
- किशोर कुबल
पणजी - गोव्यात शॅकमालक संघटनेचे पदाधिकारी जॉन लोबो यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी व्हावी यासाठी पर्यटन खात्याने दक्षता खात्याकडे तक्रार केली आहे.
लोबो यानी केलेले आरोप शॅक धोरणाबद्दल तसेच पर्यटन खात्याच्या अधिकाय्रांविरुध्द आहेत व ते गंभीर स्वरुपाचे आहेत त्यामुळे १९८८ च्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्वतंत्र चौकशी करणे आवश्यक असून १५ दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश पर्यटन खात्याचे संचालक सुनील आंचिपाका यांनी दिले आहेत. शॅक ज्यांना मंजूर झालेले आहेत त्यात जॉन लोबो यांचे नाव नाही याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. गोव्याच्या किनाय्रांवर पर्यटन मोसमात ॲाक्टोबर ते मे या कालावधीत झावळांचे शॅक उभारले जातात. पर्यटक तेथे मदिरापान व अन्नपदार्थांचा आस्वाद घेतात. शॅक वाटपाच्या बाबतीत लोबो यांनी पर्यटन अधिकाय्रांवर गंभीर स्वरुपाचे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
‘लोकमत’मध्ये प्रसिध्द झालेल्या एका वृत्तात लोबो यांनी पर्यटन खात्यातील काही अधिकारी खंडणी उकळत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर एका वृत्तवाहिनीलाही लोबो यांनी मुलाखत दिली तींतही अशाच प्रकारचे आरोप केले. चौकशीसाठी यु ट्युबरील चित्रफितही दक्षता खात्याला सादर केली आहे. पर्यटन खात्याचा असा दावा आहे की, २०१९-२०२३ च्या शॅक धोरणात जॉन लोबो यांना शॅक मंजूर झालेला नाही. त्यामुळे त्यांना शॅक उभारलाच कसा आणि नुकसान झाल्याचा दावा ते कुठल्या शॅकबाबत करतात, असा पर्यटन खात्याचा सवाल आहे. वरील धोरणांतर्गत ज्यांना शॅक मंजूर झाले होते, त्यांची यादीही दक्षता खात्याला सादर करण्यात आली आहे.