गिरीश कर्नाड यांचे गोव्याशी वेगळे भावबंध
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 11:50 AM2019-06-11T11:50:23+5:302019-06-11T12:05:27+5:30
गिरीश कर्नाड यांचे गोव्याशी वेगळे भावबंध होते. गोव्यातील कोंकणी माणूस त्यांना आपला वाटायचा. अनेक गोमंतकीयांनी त्यांच्याविषयीच्या आठवणींना सोशल मीडियावरून आणि अन्य व्यासपीठांवरही उजाळा देण्यास सुरुवात केली आहे.
सदगुरू पाटील
पणजी : स्व. गिरीश कर्नाड यांचे गोव्याशी वेगळे भावबंध होते. गोव्यातील कोंकणी माणूस त्यांना आपला वाटायचा. अनेक गोमंतकीयांनी त्यांच्याविषयीच्या आठवणींना सोशल मीडियावरून आणि अन्य व्यासपीठांवरही उजाळा देण्यास सुरुवात केली आहे.
कर्नाड यांचा जन्म जरी महाराष्ट्रातील माथेरानमध्ये झाला तरी, ते कोंकणी माणूस. ते मूळचे धारवाडचे. त्यांच्या धारवाडच्या घरी अनेक गोमंतकीय लेखक, गायिका, नाटककार जात असे. एखादा गोमंतकीय घरी आल्याचे पाहून कर्नाड आणि कर्नाड यांच्या आई त्या गोमंतकीयाशी कोंकणी भाषेत बोलत असे. गोव्याच्या एक गायिका शकुंतला भरणे यांनीही अशाच प्रकारची आठवण सोशल मीडियावर शेअर केली आहे. गोवा विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. नंदकुमार कामत यांनी देखील कर्नाड यांच्याविषयीचा आपला अनुभव व आठवण याचा उल्लेख फेसबुकवर केला आहे.
कर्नाड अनेकदा गोव्यात यायचे. 2012 साली गोव्यात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती व दिगंबर कामत हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी गोवा सुवर्ण महोत्सवी विकास मंडळाची स्थापना मुख्यमंत्री कामत यांनी केली होती. नामवंत संशोधक डॉ. रघुनाथ माशेलकर हे या मंडळाचे अध्यक्ष होते. विजय केळकर वगैरे मंडळाचे सदस्य होते. आणखी कुणाची नियुक्ती या मंडळावर करता येईल काय असे त्यावेळी गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री कामत यांनी माशेलकर यांना विचारले. त्यावेळी माशेलकर यांनी गिरीश कर्नाड यांचे नाव कामत यांना सूचविले. कामत मग कर्नाड यांच्याशी बोलले व कर्नाड त्या मंडळावर काम करण्यास तयार झाले. मध्यंतरीच्या कालावधीत एका चित्र प्रदर्शनावरून वाद निर्माण झाल्यानंतर कर्नाड यांनी तात्त्विक आणि वैचारिक भूमिका घेत मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा जाहीर केला होता. मग पुन्हा कामत यांनी कर्नाड यांच्याशी बोलणी करून राजीनामा मागे घेण्याची त्यांना विनंती केली होती. कर्नाड यांनी ती विनंती मान्य केली.
कामत यांनीही लोकमतला कर्नाड यांच्याविषयीच्या आठवणी सांगितल्या. गोव्यासाठी पुढील पंचवीस वर्षाचे व्हिजन ठरविण्याच्या हेतूने या मंडळाची स्थापना झाली होती. माशेलकर यांच्यासोबत कर्नाड यांनीही बऱ्यापैकी या कामात रस घेतला. आम्ही गोव्यात त्यावेळी युवकांशी संवादाचे दोन मोठे कार्यक्रम आयोजित केले होते. त्यात कर्नाडही सहभागी झाले होते, असे कामत यांनी सांगितले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मी सहज भुतकाळामध्ये गेलो, असे कामत म्हणाले.