काँग्रेसची मदार युवा नेत्यांवरच; दिग्गजांनी पक्षांतर केल्याने कसोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 08:03 AM2024-01-05T08:03:37+5:302024-01-05T08:08:12+5:30
गतवैभव प्रस्थापित करण्याचे आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ७ मतदारसंघांच्या समावेशामुळे उत्तर गोव्यातील सर्वांत मोठा तालुका म्हणजे बार्देश तालुका. विद्यमान स्थितीत यातील ६ मतदारसंघ भाजपच्या, तर एकमेव हळदोणा हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे.
त्यामुळे भाजपचे वर्चस्व असलेल्या या तालुक्यावरील आपले गतवैभव पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसला आपली पूर्ण ताकद पणाला लावून कसोसीने प्रयत्न करावे लागणार आहेत. विद्यमान स्थितीत पक्षासोबत असलेल्या नव्या दमाच्या युवा नेत्यांना सोबत घेऊन लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणे, या पक्षाला भाग पडणार आहे.
२०१७ नंतर चित्र पालटले २०१७च्या निवडणुकीत आमदारांची संख्या घटून ती उवर आली. त्यानंतर थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी इतर आमदारांसमवेत भाजपात प्रवेश केल्यानंतर तालुक्यातील भाजप आमदारांची संख्या चार झाली. त्यावेळी भाजपाची मगोपशी युती नसल्याने झालेल्या मतविभागणीतून आमदारांची संख्या घटण्याचे कारण बनले होते.
पक्ष सोडून उमेदवारी लाटली, पण...
विधानसभा निवडणुकीदरम्यान अनेक नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्याच दरम्यान राज्यात इतर पक्षांनी केलेल्या प्रवेशामुळे काँग्रेसचा त्याग करणाऱ्या नेत्यांचा आकडाही तेवढाच मोठा होता. उमेदवारी मिळणार नसल्याने पक्ष त्यागून इतर पक्षांच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली होती. यात कळंगुट येथील काँग्रेसचे दोन वेळचे माजी आमदार आग्नेल फर्नाडिस तसेच अँथोनी मिनेझिस, तारक आरोलकर तसेच उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या पक्षातील इतर काही नेत्यांचा त्यात समावेश होता. म्हापसा मतदारसंघातून रिंगणात उतरलेले काँग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर, थिवीतील उमेदवार अमन लोटलीकर हे पक्षापासून दुरावले आहेत. साळगावांतील नेते तुलियो डिसोझा हेसुद्धा सक्रिय नाहीत. पक्षाच्या बुजुर्ग नेत्यांनी स्वतःला पक्षाच्या सक्रिय कार्यापासून दूर राहिले आहेत. पर्वरी, साळगाव, कळंगुट, शिवोली मतदारसंघात नेत्यांची कमतरता भासत आहे.
२०२२ साली काँग्रेसकडे ४, भाजपकडे ३ जागा
२०२२ च्या निवडणुकीत काँग्रेसने ४ मतदारसंघावर, तर भाजपने ३ मतदार संघावर विजय प्राप्त केला. पण, त्यानंतर तालुक्यातील काँग्रेसचे तीन आमदार, मायकल लोबो, डिलायला लोबो तसेच केदार नाईक यांनी नंतर भाजपात प्रवेश केल्याने पक्षाची संख्या हळदोण्याचे आमदार कार्ल्स फेरेरा यांच्या रुपात १ वर आली आहे. अशावेळी आज पूर्ण तालुक्याची धुरा वाहण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडण्याची शक्यता आहे. निवडणुकीत काँग्रेसला फक्त कळंगुट या एकमेव मतदारसंघातून आघाडी मिळवणे शक्य झाले होते. इतर मतदारसंघातील भाजपची आघाडी कमी करण्यात काँग्रेसला २०१९ लोकसभा निवडणुकात यश प्राप्त झाले, कमी झालेली आघाडी वर्चस्व सिद्ध करून दाखवण्यापुरती नव्हती.
२०१२ साली सातपैकी ६ मतदारसंघ होते भाजपकडे
२०१२च्या निवडणुकीवेळी तालुक्यातील सात मतदारसंघातील ६ मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होते. भाजपाने मगोपसोबत केलेली युती वर्चस्वाला कारण ठरली होती. त्यामुळे हा तालुका भाजपचा बालेकिल्ला म्हणून संबोधला जात होता.
काँग्रेसमध्ये पहिल्या फळीतील नेत्यांची पोकळी भासतेय...
सध्या पक्षाकडे जे नेते उपलब्ध आहेत त्यातील बऱ्याच नेत्यांनी स्वतःला पक्ष कार्यापासून दूर ठेवल्याने पक्षाला तालुक्यातील फेररचना करण्याचे काम हाती घेणे भाग पडले. हळदोणा मतदारसंघवगळता इतर सर्व मतदारसंघाची फेररचना करण्यात आली आहे. तालुक्याची धुरा वाहण्यासाठी पक्षाकडे पहिल्या फळीतील नेत्यांची पोकळी निर्माण झाल्याने दुसन्या फळीतील नेत्यांकडे जबाबदारी सोपवणे भाग पडले. यात उत्तर गोव्याची जबाबदारी विरेंद्र शिरोडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. त्यांच्या जागी असलेले नेते विजय भिके यांची नेमणूक प्रदेश कार्यकारिणीवर करण्यात आली. त्याचवेळी गट समित्या तालुका तसेच इतर पक्षांच्या इतर विविध समित्यांची जबाबदारी नव्या दमाच्या नेत्यांकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
लक्षवेधी आंदोलने केली, तरीही नेतृत्त्वाचा अभाव
विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने काही लक्षवेधी आंदोलनेसुद्धा केली. त्यांच्याकडे पक्षाची सक्षमपणे धुरा वाहण्याची क्षमता असलेल्या नेत्याची कमतरता प्रत्येकवेळी दिसून आली. परिणामी म्हणावा तसा प्रतिसाद पक्षाला लाभू शकला नव्हता. अशावेळी सर्व परिस्थितीवर मात करून पक्षाच्या नेत्यांना एकत्रित आणून काँग्रेसला एकजुटीने लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणे भाग पडणार आहे.