गोवा काँग्रेसचे अध्यक्ष शांताराम नाईकच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2018 10:26 PM2018-01-06T22:26:56+5:302018-01-06T22:27:03+5:30
शांताराम नाईक हेच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राहणार असल्याचा आदेश अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव जनार्दन द्विवेदी यांनी जारी केला आहे.
पणजी: शांताराम नाईक हेच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राहणार असल्याचा आदेश अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव जनार्दन द्विवेदी यांनी जारी केला आहे. जो पर्यंत पुढील सूचना येत नाही तोपर्यंत प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे नाईक यांच्याकडेच राहणार आहेत.
काँग्रेस पक्षाच्या नवीन प्रदेशाध्यक्षाच्या निवडीसाठी गोव्यात प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी आणि केवळ श्रेष्ठीच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत काँग्रेसजन असले तरी विद्यमान अध्यक्ष शांताराम नाईक हेच प्रदेशाध्यक्ष म्हणून राहतील. जोपर्यंत केंद्राकडून वेगळा निर्णय घेतला जाणार नाही आणि विशेष सूचना राज्याला दिली जाणार नाही तोपर्यंत त्यात बदल होणार नाही असे द्विवेदी यांनी म्हटले आहे. गोव्यासह इतर राज्ये व केंद्र शाषित प्रदेशातील कॉंग्रेस प्रदेश समितींनाही हा आदेश लागू होत आहे.
दरम्यान, मागील बरेच महिने कॉंग्रेसची पदाधिकारी निवडीसाठी अंतर्गत निवड प्रक्रिया सुरू होती. प्रदेशाध्यक्षपदासाठी गिरीष चोडणकर आणि आतिष नायक यांची नावे अग्रक्रमांवर आहेत या दोघांपैकीच एकाला प्रदेशध्यक्ष बनविण्यात येणार असून राहुल गांधी यांची अखील भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर गोव्याच्या बाबतीत घोषणा होणार अशी अपेक्षा होती. परंतु हा गुंता अद्याप सुटलेला नाही.