गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चेतन देसाई यांची तीन तास चौकशी
By admin | Published: September 30, 2016 06:49 PM2016-09-30T18:49:16+5:302016-09-30T18:49:16+5:30
गोवा क्रिकेट असोसिएशनमधील ३ कोटी १३ लाख रुपयांच्या घोटाळा प्रकरणात अध्यक्ष चेतन देसाई यांची शुक्रवारी सकाळी आर्थिक गुन्हे विभागाच्या पोलिसांनी तब्बल तीन तास चौकशी केली.
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ३० : गोवा क्रिकेट असोसिएशनमधील ३ कोटी १३ लाख रुपयांच्या घोटाळा प्रकरणात अध्यक्ष चेतन देसाई यांची शुक्रवारी सकाळी आर्थिक गुन्हे विभागाच्या पोलिसांनी तब्बल तीन तास चौकशी केली. त्यांच्या पत्नीलाही दुसऱ्यांदा जबानीसाठी बोलावण्यात आले आहे. चेतन यांनी २ कोटी ४८ लाख रुपयांच्या ज्या कायम ठेवी बँकेत ठेवलेल्या आहेत त्यासाठी पैसे आणले कुठून याची चौकशी पोलिस करीत आहेत. याबाबतीत खुलासा करण्यासाठी त्यांना सोमवारपर्यंत मुदत दिलेली आहे.
आर्थिक गुन्हे विभागाच्या पोलिस अधिक्षक प्रियांका कश्यप यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, कायम ठेवींसाठी पैसे कुठून आणले याबाबत चेतन हे समाधानकारक उत्तर देऊ शकलेले नाहीत तसेच त्यांनी कोणतेही दस्तऐवजही सादर केलेले नाहीत. काही वेळ मागून घेतल्याने सोमवारपर्यंत दस्तऐवज सादर करण्यासाठी त्यांना मुदत दिलेली नाहे. कायम ठेवींबाबत सर्व व्यवहार रोखीने झालेले आहेत त्यामुळे हे पैसे कुठून आणले याचा खुलासा त्यांनी करावाच लागेल. जीसीएतील घोटाळ्याचा हा पैसा आहे का, याची कसून चौकशी सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आठ वेगवेगळ्या कायम ठेवींमध्ये १ कोटी ४८ लाख रुपये गुंतविण्यात आले आहेत. या आठही कायम ठेवी पत्नीच्या नावे आहेत तर कन्येच्या नावाने १ कोटी रुपयांची कायम ठेव आहे. जानेवारी-फेब्रुवारी २0१५ मध्ये या ठेवी ठेवण्यात आल्या परंतु नंतर रक्कम मुदत संपण्याआधीच काढण्यात आल्या. हे पैसे आले कुठून याचा स्रोत पोलिसांना जाणून घ्यायचा आहे. २00७-0८ मध्ये जीसीएमधील घोटाळ्यांशी या रकमेचा संबंध आहे का, याची चौकशी केली जात आहे.
भारतीय क्रिकेट असोसिएशनने (बीसीसीआय) गोवा क्रिकेट असोसिएशनला टेलिव्हिजनच्या हक्कापोटी दिलेल्या निधीत २ कोटी ८७ लाख रुपयांचा घोटाळा झाला होता. अस्तित्त्वात नसलेल्या व्यक्तीच्या नावाने या तिघांनी जीसीएच्या बॅकेमधील खात्यातून २६ लाख रुपये काढल्याचा आरोप आहे.