गोवा डेअरीकडून राज्याला होतो ५४ हजार लिटर दुधाचा पुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 01:36 PM2023-12-19T13:36:49+5:302023-12-19T13:38:27+5:30
कंपन्यांकडून भागवली जाते सामान्यांसह पर्यटकांची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : दूध हा आमच्या जीवनातला एक अविभाज्य असा अन्नघटक आहे. दूध लागत नाही असा माणूस मिळणे विरळाच म्हणावा लागेल, गोव्यातसुद्धा दुधाला प्रचंड मागणी आहे. गोवा हे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असल्याने येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. सहाजिकच इथल्या हॉटेलला मोठ्या प्रमाणावर दुधाचा पुरवठा लागत असतो.
गोव्यात सुमारे २२ लहान-मोठ्या कंपन्या दुधाचा पुरवठा करतात; परंतु सगळ्यात मोठा पुरवठादार म्हणून गोवा डेअरीचे नाव घ्यावे लागेल. आजच्या घडीला सुमारे ५३ ते ५४ हजार लिटर दूध गोवा डेअरीच्या माध्यमातून गोमंतकीयांना पुरविले जाते.
गोवा डेअरीमध्ये अहोरात्र दूध प्रक्रिया करण्याचे काम सुरू असते. येथे बंद पाकिटामध्ये दूध भरले जाते. बंद पाकिटामध्ये भरलेले दूध थेट टेम्पोच्या माध्यमातून मुख्य वितरक व इतर वितरकांकडे भल्यापहाटे पोहोचते करण्याचे काम होते. संपूर्ण गोव्याचा विचार करता अभ्यासकांच्या मते गोव्याला किमान अडीच ते तीन लाख लिटर दुधाचा पुरवठा हवा असतो. संपूर्ण गोव्याचा विचार करता थेट दूध उत्पादकांकडून दूध घेण्याचे प्रमाण खूप कमी आहे. आजच्या घडीला ९८ टक्के खप हा पाकीट दुधाच्या माध्यमातून होत असतो.
गोवा डेअरीमध्ये अद्ययावत यंत्रणा
गोव्यात ठिकठिकाणी दूध उत्पादक संस्था आहेत. त्या ग्रामीण दूध संस्थेच्या माध्यमातून गावातील शेतकरी दूध जमा करतात. सदरचे दूध एक विशिष्ठ क्रमांक व कोडनुसार कॅनमध्ये भरून गोवा डेअरीमध्ये आणले जाते. गावात ग्रामीण दूध संस्थेत त्या दुधाची तपासणी होतेच. त्याचबरोबर गोवा डेअरीमध्ये अद्ययावत अशी दूध तपासणी करणारी यंत्रणा आहे. त्या माध्यमातून दुधात भेसळ वगैरे झाली आहे की नाही, याची तपासणी केली जाते.
दुधाची तपासणी कोण करणार?
गावातील दूध उत्पादक संस्थाच्या केंद्रामध्ये दुधाची नियमित तपासणी केली जाते. त्याचबरोबर सदरचे दूध गोवा डेअरीमध्ये येताच त्याचे नमुने गोळा करून त्या दुधाची पुन्हा तपासणी केली जाते. इथे चांगल्या शिक्षित कर्मचारीवर्गाकडून त्या दुधाची तपासणी केली जाते.
इथल्या शेतकऱ्यांची आपल्या व्यवसायावर श्रद्धा असल्याने गोव्यात भेसळ वगैरे सहसा होत नाही. परत मुळात भेसळ करून त्यांना त्याचा फायदा काही जास्त होत नाही. दूध उत्पादक शेतकरी हे आपापल्या संस्थेचे सदस्य असतात. भेसळ वगैरे आढळून आली तर संस्थेचे नाव खराब होऊ शकते म्हणून दूध उत्पादक शेतकरी भेसळ करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. कारण त्यांना माहिती असते गोवा डेअरीमध्ये दुधाची तपासणी केल्यास त्यांच्या संस्थेचे नाव खराब होऊ शकते. गावातून गोवा डेअरीमध्ये ज्या कॅनमधून दूध येते तेसुद्धा सील पैक असतात. परत तिथे भेसळ करण्याची शक्यता नसते. कारण दूध उत्पादक संस्थेच्या केंद्रामध्ये दुधाची तपासणी करून नोंदणी केलेली असते. तिथली नोंदणी व गोवा डेअरीमधील नोंदणीमध्ये फरक आढळल्यास कंत्राटदारास दोषी धरता येते. - डॉ. योगेश राणे, व्यवस्थापकीय संचालक, गोवा डेअरी.