गोवा-दिल्ली प्रवास आणखी सुखकर; गोवा एक्स्प्रेसमध्ये LHB बनावटीच्या डब्यांची सोय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 09:09 AM2023-06-16T09:09:38+5:302023-06-16T09:10:16+5:30
वास्को येथून सुटणारी हजरत निजामुद्दीन, दिल्ली गोवा एक्स्प्रेस' ही रेल्वे आता प्रवाशांना जास्त आरामदायी, सुरक्षित आणि अधिक सुविधेचा प्रवास देणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क वास्को: वास्को येथून सुटणारी हजरत निजामुद्दीन, दिल्ली गोवा एक्स्प्रेस' ही रेल्वे आता प्रवाशांना जास्त आरामदायी, सुरक्षित आणि अधिक सुविधेचा प्रवास देणार आहे. पूर्वी गोवा एक्स्प्रेस रेल्वे 'आयसीएफ' बनावटीच्या डब्यांतून प्रवाशांना नेत असे. गुरूवार (दि. १५) पासून या रेल्वेचे डबे बदलले असून, दुपारी वास्को रेल्वे स्थानकावर बावटा दाखविल्यानंतर ती 'एलएचबी' बनावटीच्या डब्यांतून प्रवाशांना घेऊन निघाली.
गुरूवारी दुपारी 3 वाजता वास्को रेल्वे स्थानकावरून गोवा एक्स्प्रेस रेल्वे (१२७७९) प्रवाशांना घेऊन हजरत निजामुद्दीन, दिल्ली मार्गावर जाण्यासाठी निघाली. या गाडीचे डबे बदलले असन आता ती 'एलएचबी' (लिंक हॉफमन बुश) बनावटीच्या डब्यातून प्रवाशांना नेणार आहे. दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय इलेक्टिक अभियंता एच विजयकुमार यांनी बावटा दाखविल्यानंतर ती प्रवाशांना घेऊन निघाली.
यावेळी त्यांच्याबरोबर कोचिंग डेपो अधिकारी जी. शेख, वास्को रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक विपुल कुमार आणि इतर अधिकारी उपस्थित होते. हे डबे 'अँटी टेलिस्कोपिक कोच' पद्धतीचे असून, त्यामुळे यदा कदाचित अपघात घडल्यास प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पूर्वीपेक्षा जास्त फायदेशीर ठरणार आहेत. डबे जास्त लांब असल्याने प्रवासादरम्यान प्रवाशांना जास्त जागा उपलब्ध होणार आहे.
आता गोवा एक्स्प्रेसमध्ये ४ थ्री टायर इकॉनॉमिक एसी बोगींची सुविधा उपलब्ध आहे. दरम्यान, दिल्लीहून प्रवाशांना घेऊन वास्को रेल्वे स्थानकावर येणारी १२७८० रेल्वेला यापुढे एलएचबी बनावटीच्या बोगी जोडण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली.
पूर्वी वास्को रेल्वे स्थानकावरून दिल्लीला जाणारी गोवा एक्स्प्रेस रेल्वे आयसीएफ पद्धतीच्या डब्यांतून प्रवाशांना नेत असे. वास्को रेल्वे स्थानका- वरून निघणाच्या पूर्वीच्या गोवा एक्स्प्रेस रेल्वेला २२ डबे होते. त्यात १ टू टायर एसी, ४ श्री टायर एसी, ९ स्लीपर कोच, ३ जनरल बोगी, १ पेंट्री, २ पार्सल बोगी आणि २ पॉवर कार्गो (जनरेटर) चे डब्बे असायचे. यामधून सुमारे ९८४ प्रवाशांना नेण्याची क्षमता होती. आता याला २० एलएचबी डबे असणार आहेत. त्यात १ फर्स्ट क्लास एसी, २ टू टायर एसी, ४ श्री टायर एसी, ४ थ्री टायर इकॉनॉमिक एसी, २ स्लीपर कोच, २ जनरल बोगी, २ एससीआर, १ पेंट्री कोच आणि २ पार्सल बोगी असणार आहेत. गाडीची ८४८ प्रवाशांना नेण्याची क्षमता आहे.