सार्वमत, गोव्याला मिळालेले घटक राज्य तसेच कोकणी राजभाषेचा लढा अभ्यासक्रमात लावा - गोवा फॉरवर्डची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 06:20 PM2018-01-05T18:20:44+5:302018-01-05T18:22:23+5:30
१९६७ चे सार्वमत, गोव्याला मिळालेले घटक राज्य तसेच कोकणीला राजभाषा म्हणून मिळालेला दर्जा व त्यासाठी झालेला लढा या सर्व गोष्टींचा शालेय अभ्यासक्रमात इतिहास विषयात समावेश करावा तसेच
पणजी : १९६७ चे सार्वमत, गोव्याला मिळालेले घटक राज्य तसेच कोकणीला राजभाषा म्हणून मिळालेला दर्जा व त्यासाठी झालेला लढा या सर्व गोष्टींचा शालेय अभ्यासक्रमात इतिहास विषयात समावेश करावा तसेच सार्वमताचे जनक जॅक सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभा संकुलात उभारला जावा, आदी मागण्या गोवा फॉरवर्ड पक्षाने केल्या आहेत. येत्या १६ रोजी सायंकाळी मडगांव येथील लोहिया मैदानावर या प्रश्नांवर पक्षाने जाहीर सभेचे आयोजन केले आहे.
पत्रकार परिषदेत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई म्हणाले की, सार्वमताचे जनक दिवंगत जॅक सिक्वेरा यांच्यावर अन्याय झालेला आहे. जॅक सिकेरा यांनी सार्वमत घ्यायला भाग पाडले नसते तर गोवा महाराष्ट्रात विलीन झाला असता. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचा पुतळा विधानसभा संकुलात आहे. त्यांच्याबरोबरच जॅक सिक्वेरा यांनाही स्थान दिले जावे का, या प्रश्नावर ते म्हणाले की, सार्वमतामुळे गोवा स्वतंत्र राहिला म्हणूनच भाऊसाहेब नंतरची काही वर्षे मुख्यमंत्री राहिले आणि गोव्याचा विकास घडविला. आम्हीही आमदार, मंत्री बनू शकलो. त्यामुळे सिक्वेरा यांना हे स्थान मिळायलाच हवे.
पत्रकार परिषदेस जलस्रोतमंत्री विनोद पालयेंकर, गृहनिर्माणमंत्री जयेश साळगांवकर तसेच पक्षाचे मुख्य प्रवक्ते ट्रोजन डिमेलो उपस्थित होते. सरदेसाई पुढे म्हणाले की, गोव्याचा इतिहास केवळ मुक्तीपर्यंत येऊन संपत नाही तर त्यानंतरही गोव्याच्या अस्मितेच्यादृष्टिने अनेक गोष्टी घडलेल्या आहेत त्या नव्या पिढीला समजल्या पाहिजेत. १६ जानेवारी १९६७ साली गोवा महाराष्ट्रात विलीन करावा की नाही, या प्रश्नावर सार्वमत घेण्यात आले होते. सार्वमताचे येणारे ५१ वे वर्ष वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरे केले जाईल. ‘अस्मिताय जागोर’ खाली अनेक कार्यक्रम हाती घेणार आहोत. फातोर्डा येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन आहे. सार्वमत तसेच गोवा मुक्तीलढ्यात ज्यानी योगदान दिले अशा ३0 व्यक्तींच्या तसबिरी फातोर्ड्यात प्रदर्शित केल्या जातील. वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.
सरकारी पातळीवरही सार्वमतदिन साजरा केला जावा, अशी मागणी त्यांनी केली. मडगांवच्या रविंद्र भवनात विद्यार्थ्यांसाठी येत्या १६ रोजी विशेष स्पर्धा घेतल्या जातील. त्या दिवशी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अशाच वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी करुन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, गोवा मुक्तिच्या इतिहासाचे दस्तऐवजीकरण करणे आवश्यक आहे. पुरातत्त्व खात्यातर्फे लवकरच ‘लिबरेशन मेमोरियल’ उघडले जाईल. त्यासाठी सचिवालयाची जुनी इमारत (आदिलशहाचा राजवाडा) किंवा काबो राजनिवास उपयुक्त ठरले असते. परंतु अजून जागा निश्चित झालेली नाही.
देशी पर्यटक गोव्यात हवेतच कशाला?
देशा पर्यटकांमुळे गोव्याच्या साधनसुविधांवर ताण पडतो, उत्पन्न मात्र काही होत नाही त्यामुळे हे पर्यटक हवेतच कशाला असा सवाल त्यांनी केला. त्याऐवजी चांगल्या साधनसुविधा देऊन जास्त खर्च करु शकणाºया विदेशी पाहुण्यांवर लक्ष केंद्रित करणे संयुक्तिक ठरेल. त्यासाठी साधन सुविधांचा दर्जा वाढवावा लागेल. देशी पर्यटक स्वत:ची वाहने घेऊन येतात. रस्त्याच्या बाजुला स्वत:च स्वयंपाक करतात आणि मद्यही घाऊक दुकानातून खरेदी करतात. गोव्यातील व्यावसायिकांना या पर्यटकांचा काहीच फायदा होत नसल्याचे ते म्हणाले.