Goa: हद्दपार बांगलादेशीला पुन्हा म्हापशात अटक
By काशिराम म्हांबरे | Published: December 7, 2023 03:13 PM2023-12-07T15:13:27+5:302023-12-07T15:14:59+5:30
Goa Crime News: जानेवारी महिन्यात पकडून हद्दपार केलेला बांगलादेशी नागरिक मोहम्मद जहांगीर मोंडल ( वय २४) याला म्हापसा पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे.
- काशीराम म्हांबरे
म्हापसा - जानेवारी महिन्यात पकडून हद्दपार केलेला बांगलादेशी नागरिक मोहम्मद जहांगीर मोंडल ( वय २४) याला म्हापसा पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे.
उपअधिक्षक जिवबा जळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार काल बुधवारी संध्याकाळी येथील पोलीस स्थानकाच्या हद्दीत फिरताना पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याची सखोल चौकशी केली असता तो बांगलादेशी नागरिक असल्याचे आढळून आले. यावेळी तपासयंत्रणेकडून त्याच्याजवळ भारतात वास्तव करून राहण्यासाठी लागणाºया वैध कागदपत्रांची मागणी करण्यात आली. केलेल्या मागणीनुसार तो कागदपत्रे सादर करू शकला नाही. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात पोलिसांनी विदेशी कायदा व पासपोर्ट प्रवेश कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मोहम्मद जहांगीर मोंडल याला वेर्णा पोलिसांकडून याच वर्षी जानेवारीत अटक करण्यात आली होती. त्यानंतर वास्को येथील प्रथम वर्ग न्यायालयाने त्याला दोषी ठरवून देशातून हद्दपारीचे आदेश दिले होते. दिलेल्या आदेशानंतर त्याची बांगलादेशात रवानगी करण्यात आलेली.
गोव्यात रोजंदारीवर काम करणाºया मोंडल याची बांगलादेशात रवानगी केल्यानंतर त्यांनी तेथील हद्दपार करून पुन्हा भारतात प्रवेश मिळवला होता. त्यानंतर थेट रेल्वेतून प्रवास करीत गोव्यात दाखल झाला होता. पुढील तपास कार्य निरीक्षक सिताकांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आले आहे.