मंत्रिपदाने गोव्याच्या विकासाला गती: केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2024 01:09 PM2024-06-16T13:09:30+5:302024-06-16T13:10:25+5:30
दिल्लीत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात आगमन
लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: केंद्र सरकारमध्ये जी जबाबदारी मला मिळाली, ती गोमंतकीयांच्या आशीर्वादामुळे मिळाली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मंत्रिपदाची जबाबदारी योग्य पद्धतीने निभावून देशाच्या विकासासाठी सक्रिय पद्धतीने काम करणार आहे. माझ्याकडील मंत्रिपदाचा फायदा गोवा राज्यालाही चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी मी प्राधान्य देऊन काम करणार असल्याचे केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नाईक यांनी दिल्लीत मंत्रिपदाची शपथ घेऊन केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पदाचा ताबा स्वीकारला. त्यानंतर शनिवारी (दि.१५) ते गोव्यात पोहचले असता दाबोळी विमानतळावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दाबोळी विमानतळावर पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, भाजपचे पदाधिकारी चंद्रकात गावस, नगरसेवक अमय चोपडेकर आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. मंत्री नाईक म्हणाले, मला मिळालेले मंत्रीपद गोमंतकीयांच्या आशीर्वादानेच लाभले आहे. या मंत्रिपदाच्या माध्यमातून गोव्याचा विकास व्हावा, यावर मी प्राधान्याने काम करणार आहे. भविष्यात गोव्याचा आणखीन विकास व्हावा यासाठी मी सर्व प्रकारची पावले उचलणार आहे. सर्वांनी एकत्र येऊन गोव्याला पुढे नेणे गरजेचे आहे.
आमदार आमोणकर म्हणाले, की मंत्री श्रीपाद नाईक यांना केंद्र सरकारने मोठी जबाबदारी दिली असून त्यांची काम करण्याची क्षमता पाहूनच त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. देशात सौर ऊर्जेच्या क्षेत्रात बदल घडत असून मंत्री नाईक या क्षेत्रात देशात आणि गोव्यात मोठा विकास करतील.
गोव्याच्या विकासाला हातभार
आमदार कृष्णा साळकर यांनीही नाईक यांना मंत्रिपदाची जबाबदारी दिल्याने आनंद व्यक्त केला. गोमंतकीयांना मंत्री नाईक यांचा मोठा अभिमान आहे. केंद्र सरकारमध्ये काम करण्याची क्षमता पाहून त्यांना आणखीन मोठी जबाबदारी देण्यात आली, असे ते म्हणाले.