दिल्लीत गेल्यानंतर ह्रदयविकाराचा झटका, IPS अधिकारी प्रणब नंदा यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 09:44 AM2019-11-16T09:44:37+5:302019-11-16T09:47:02+5:30
नंदा यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या निधनाची माहिती गोवा पोलिसांना देण्यात आल्याचे पणजी पोलीसांकडून सांगण्यात आले.
पणजी: आयपीएस अधिकारी गोव्याचे पोलीस महसंचालक प्रणब नंदा यांचे शुक्रवारी मध्यरात्री १ वाजता नवी दिल्लीत हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रणब नंदा हे कार्यालयीन कामानिमित्त दिल्ली येथे गेले होते. शनिवारी मध्यरात्री त्यांच्या हृदयात कळा येवू लागल्याने त्यांना दिल्ली येथील एम्स इस्पितळात दाखल करण्यात आले. परंतु तिथे त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरने जाहीर केले.
नंदा यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या निधनाची माहिती गोवापोलिसांना देण्यात आल्याचे पणजी पोलीसांकडून सांगण्यात आले. नंदा हे १९८८ च्या बॅचचे अॅगमुट कॅडरचे आयपीएस अधिकारी होते. गोव्याचे पोलीस संचालक म्हणून पदभार स्विकारुन अद्याप एक वर्षही पूर्ण झालेले नाही, ते ५७ वर्षे वयाचे होते. त्यांच्या पत्नी सुंदरी नंदा याही आयपीएस अधिकारी असून पोलीस महानिरीक्षक म्हणून त्यांनी यापूर्वी गोव्यातही काम केले आहे. नंदा यांच्या आकस्मिक निधनामुळे धक्का बसल्याचे गोव्याचे पोलीस महानिरीक्षक जसपालसिंग यांनी म्हटले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नंदा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.