मुलांचे राजकीय लाँचिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 12:19 PM2023-05-05T12:19:29+5:302023-05-05T12:21:32+5:30
सर्व राज्यांतील सर्वपक्षीय राजकीय नेते आपल्यानंतर आपल्या मुलांची राजकारणात सोय करू लागले आहेत.
कर्नाटक असो, महाराष्ट्र असो किंवा गोवा. सर्व राज्यांतील सर्वपक्षीय राजकीय नेते आपल्यानंतर आपल्या मुलांची राजकारणात सोय करू लागले आहेत. काहीजण राजेशाही पद्धतीने थेट व्यवस्था करतात, तर काहीजण पडद्याआड राहून किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने मुलांना राजकारणात आणतात. आपल्यानंतर मुलांनीच आपला मतदारसंघ सांभाळायला हवा, असा आग्रह बहुतेक राजकीय नेते धरू लागले आहेत. मुलांनीही आपल्याप्रमाणे आमदार व मंत्री व्हायला हवे, अशा इच्छेतून आपापले मतदारसंघ राजकीय नेते बांधून टाकू लागले आहेत. माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांचे पुत्र योगीराज यांच्याविषयी काल मीडियाशी कामत बोलले. आपल्यानंतर आपला मुलगा मडगावमध्ये लढेल, असे कामत यांनी थेट सांगितले नाही, तरी त्यांनी मुलाच्या राजकीय एन्ट्रीचे स्पष्ट संकेत दिले. 'आपला मुलगा आपल्याला प्रत्येक निवडणुकीवेळी चांगली मदत करतो. त्याची पुढील वाटचाल मडगावचे लोक ठरवतील,' असे विधान कामत यांनी केले.
कामत जे बोलले ते अपेक्षितच होते. मडगावात कामत यांना कुणी पराभूत करू शकत नाही. कामत जोपर्यंत सक्रिय आहेत, तोपर्यंत त्यांचा मुलगा मडगावमध्ये निवडून येऊ शकतो, असे सांगणारे लोक मडगावमध्ये कमीच आहेत. राजकारणात प्रत्येकाने स्वतःचा मार्ग शोधण्याची गरज आहे, असेही कामत योगीराजविषयी बोलताना म्हणाले. आपल्या मुलाचे राजकीय लाँचिंग ते कधी ना कधी तरी करतीलच. तूर्त त्यांना मुख्यमंत्री सावंत यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद दिले जाईल की नाही, याबाबत स्पष्टता नाही. कामत यांनी जाहीरपणे मंत्रिपदावर अजून दावा केलेला नाही. त्यांना लोकसभा निवडणुकीवेळी भाजप दक्षिण गोव्यात उभे करेल, •अशी चर्चा अधूनमधून सुरू असते. मात्र, कामत यांना राष्ट्रीय राजकारणात जाण्याची इच्छा नसावी. लोकसभा निवडणूक ते लढवू इच्छित नसावेत. त्यांना राज्यसभेवर पाठवून नारायण राणे यांच्याप्रमाणे मंत्री करावे, असादेखील विचार भाजपचे श्रेष्ठी करू शकतात, असेही भाजपचे काही पदाधिकारी सांगतात. अजून कोणत्याच विषयाबाबत स्पष्टता नाही.
कामत हे २००७ ते २०१२ पर्यंत मुख्यमंत्री होते. त्यानंतर मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर कामत यांना टार्गेट केले. कामत यांची सर्व बाजूंनी कोंडी केली. कामत गोवा भाजपच्या हिटलिस्टवरील क्रमांक एकचे शत्रू होते. मात्र, दैवाची गती वेगळी असते. आज पर्रीकर हयात नाहीत आणि कामत पुन्हा भाजपमध्ये दाखल झाले आहेत. एवढेच नव्हे तर गृहमंत्री अमित शाह यांचे कामत हे काही प्रमाणात लाडकेही झाले आहेत. अलीकडेच फोंड्यात शाह यांची सभा होती, तेव्हा शाह यांनी कामत यांना खूप सन्मानाने वागविले. भविष्यात कामत यांच्या मुलाचे मडगावात लॉचिंग झाल्यानंतर मग गोव्यातील अन्य काही राजकीय नेतेही आपल्यानंतर आपल्या मुलांची सोय करण्याचा विचार पक्का करतील. आताच बाबूश मोन्सेरात, रवी नाईक, सुदिन ढवळीकर अशा नेत्यांनी सज्जता ठेवलेली आहे. बाबूशने भाजपला न जुमानता पणजीत आपल्याच मुलाला महापौर करून टाकले. रवी नाईक यांनी भाजपच्या नाकावर टिच्चून आपल्या दोन्ही मुलांना फोंडा पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. घराणेशाहीच्या गोष्टी भाजपचे नेते फक्त काँग्रेसबाबतच सांगत राहिले.
आपली घराणेशाही नव्हे, काँग्रेसची तेवढीच घराणेशाही ही भाजपची नीती कर्नाटक व महाराष्ट्रातही पाहायला मिळते. मायकल लोबो यांनी गेल्या निवडणुकीत आपल्यासोबत आपल्या पत्नीलाही रिंगणात उतरविले, डिलेयला आमदारही झाली. बाबूशची पत्नी आमदार आहे, पुढील काळात मुलगाही आमदार होईल. बाबू कवळेकर यांचा एकट्याचाच प्रयोग फसला. त्यांनी पत्नी सावित्रीला आमदार बनविण्यासाठी खूप घाम गाळला होता. सांगेत सावित्री व केपेत बाबू पराभूत झाले हा वेगळा मुद्दा म्हापशात फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा आमदार झाला. पूर्वीच्या काळात एखादा राजकीय नेता निवृत्त झाल्यानंतर त्या नेत्याच्या जवळचा किंवा अत्यंत विश्वासू कार्यकर्ता आमदार होत असे. मात्र, आता मुलेच आमदार- खासदार-मंत्री होतात. कार्यकर्ते हे कायम कार्यकर्तेच बनून राहतात.