गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात १.३९ लाखांची अफरातफर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 10:51 PM2018-11-13T22:51:37+5:302018-11-13T22:51:51+5:30
कारकुनावर गुन्हा दाखल
पणजी: जिल्हाधिकारी कार्यालयातील कारकून म्हणून काम करणाऱ्या गौरीश केरकर यांने १.३९ लाख रुपयांची अफरातफर केल्याचा गुन्हा पणजी पोलीस स्थानकात नोंदविण्यात आला आहे. मागील एका वर्षाच्या कालावधीत लोकांकडून भरण्यात आलेल्या विविध स्वरूपातील शुल्काच्या रक्कमेवर ताव मारण्याचे काम त्याने चालविले होते.
रोकड काउंटर सांभाळणारा हा गौरीश लोकांकडून घेतलेल्या पैशांच्या रीतसर पावत्या वगैरे देत होता परंतु काही काळाने संगणकातील या पावत्यांची माहितीच नष्ट करीत होता. व जमा झालेले पैसे हडप करीत होता. १ एप्रिल २०१७ पासून ३० एप्रिल २०१८ पर्यंतच्या एक वर्षाच्या कालावधीत त्याने हा घोटाळा केल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक लेखा अधिकारी दिलीप मोरजकर यांनी पणजी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याची खात्यांतर्गत चौकशीही करण्यात आली होती. त्यात तो दोषी आढळल्यामुळे त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले होते. अजूनही तो निलंबितच आहे. तसेच नेहमी त्याला जिल्हाधिकारी कार्यालयात सक्तीची हजेरी लावावी लागत आहे. खात्यांतर्गत चौकशीत दोषी आढळल्यानंतर पोलीसात तक्रार देण्याचा निर्णय घेण्यात आला.
असा आला घोटाळा उघडकीस
लोकांकडून येणारे पैसे हडप करण्याचे संशयित गौरीश केरकर यांचे तंत्र तसे वेगळेच होते. त्याने स्वत:च ते विकसित केले असावे. पैसे घेतलेल्या प्रत्येकाला तो रीतसर पावती देत होता. परंतु काही काळानंतर संगणकावरील संपूर्ण माहिती (डेटा) तो नष्ट करीत होता. मध्यंतरी त्याला प्रतिनियुक्ती तत्वावर कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या कार्यालयात नेमणूक करण्यात आली आणि त्यामुळेच त्याचा भांडाभोड झाला. कारण त्यावेळी त्यांच्या जागी जिल्हाधिकारी कार्यालयातील रोकड काउन्टरवर आलेल्या दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या ही अफरातफर लक्षात आली. लगेच त्याने आपल्या वरिष्ठांना कळविली आणि नंतर त्याची चौकशी सुरू झाली व तो सापडला.