गोमेकॉत डॉक्टरांच्या संपाची झळ, रुग्णांची परवड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 01:34 PM2019-06-14T13:34:16+5:302019-06-14T13:40:08+5:30
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे (गोमेकॉ) सुमारे ३00 निवासी डॉक्टर देशव्यापी संपात सहभागी झाल्याने रुग्णांचे हाल झाले.
पणजी - गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे (गोमेकॉ) सुमारे ३00 निवासी डॉक्टर देशव्यापी संपात सहभागी झाल्याने रुग्णांचे हाल झाले. पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ दिवसभराचा संप डॉक्टरांनी पुकारला होता. गोमेकॉत विशेषत: ओपीडी सेवा कोलमडली. ओपीडीबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्या होत्या. गोमेकॉसह राज्यातील वैद्यकीय सेवेवरही याचा परिणाम दिसून आला.
कोलकाता येथे डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या संघटनांनी देशव्यापी काम बंद आंदोलन पुकारले आहे. रुग्णालयांमध्ये सुरक्षित वातावरण द्या, हल्लेखोरांना तातडीने पकडा, अशा प्रमुख मागण्या आहेत. गोव्यातही डॉक्टरांवर हल्ल्याचे प्रकार घडतात त्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लक्ष घालावे आणि पुरेसे संरक्षण द्यावे, अशी मागणी गोमेकॉतील निवासी डॉक्टरांनी केली.
सकाळी ओपीडी काही वेळ बंद राहिल्याने रुग्णांचे अक्षरश: हाल झाले. पर्यायी व्यवस्था केल्याचा दावा गोमेकॉ प्रशासनाकडून केला जात होता. परंतु प्रत्यक्षात बाह्य रुग्ण विभाग व वॉर्डमधील सेवेवर ताण आल्याचे दिसून आले. ओपीडींबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्या होत्या. रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांची यामुळे बरीच परवड झाली. अतिदक्षता विभाग तसेच इमरजन्सी युनिट मात्र चालू होते. काही ज्येष्ठ डॉक्टर मात्र सेवेत कार्यरत होते.
गोमेकॉचे अधिक्षक तथा डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे डॉक्टर संपावर असतील. रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही आणीबाणीची स्थिती हाताळण्याकरिता काँटिन्जेन्सी प्लॅन तयार केला. आमच्या सर्व ओपीडी (बाह्य रुग्ण विभाग) चालू होत्या. सर्व सिनियर डॉक्टर्सनी रुग्णांना तपासले. प्रिक्लिनिकल कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले.
Doctors Strike : मुंबईसह देशभरातील निवासी डॉक्टर आज संपावर
कोलकाता शहरातील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील दोन डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ मुंबईसह देशभरातील निवासी डॉक्टर आज संपावर आहेत. तसेच निवासी डॉक्टरांच्या सेंट्रल मार्ड संघटना, असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न महाराष्ट्र या संघटनांकडून शुक्रवारी (14 जून) राज्यव्यापी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बाह्यरुग्ण विभाग, अन्य विभाग आणि शैक्षणिक दिनक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यादरम्यान राज्यातील रुग्णालयांतील आपत्कालीन रुग्णसेवा सुरू असेल. कोलकात्यातील मारहाणीचा महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची संघटना सेंट्रलमार्ड आणि इंटर्न डॉक्टरांची संघटना अस्मी यांनी तीव्र निषेध केला आहे. तसेच, डॉक्टरांना सतत होणाऱ्या मारहणीच्या निषेधात न्याय देण्यासाठी एकत्र उभे राहू अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. याबाबत दोन्ही संघटनांनी प्रसिद्ध पत्रक काढले आहे.