Goa Election 2022: खोट्या आश्वासनांनी सरकारचे अपयश लपवू नका; अमित पालेकरांचा भाजप सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 02:21 PM2022-02-01T14:21:52+5:302022-02-01T14:29:11+5:30
Goa Election 2022: भाजप सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनांना गोवेकर बळी पडणार नाही याची खात्री आहे, असे आपने म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : ‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची खोटी आश्वासने प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे अपयश लपवू शकत नाहीत,’ अशी टीका करीत आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अमित पालेकर यांनी खाण अवलंबितांना खोटी आश्वासने दिल्याबद्दल भाजप सरकारवर हल्ला चढविला आहे.
नुकत्याच झालेल्या गोव्याच्या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, यांनी गोव्यातील खनिजाचे विधानसभा निवडणुकीनंतर पारदर्शक लिलाव प्रक्रियेसह पुन्हा कार्यान्वित केला जाईल असे जाहीर केले होते. या आश्वासनाला आम आदमी पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना अमित पालेकर म्हणाले, ‘भाजपने राज्यात दहा वर्षे राज्य केले आहे. मग राज्यातील खाणकाम सुरू करण्यापासून भाजप सरकारला कोणी रोखले होते? भाजप सरकार अकार्यक्षम असून, नि:स्वार्थी हेतूने कोणतेही काम करीत नाही, अशी टीका पालेकर यांनी केली. ‘खोटी आश्वासने देऊन गोवेकरांना मूर्ख बनविणे बंद करा. सत्तेवर असताना त्यांनी काही केले नाही. आता आपले अपयश लपवण्यासाठी भाजपकडून आश्वासने दिली जात आहेत,’ असे ते म्हणाले.
‘काम केले असेल, तर लोकांनी मतदान करावे, असे सांगण्याचे धाडस दिल्लीतील आप सरकारने दाखविले होते; पण भाजपमध्ये ही हिंमत नाही. कारण त्यांनी कोणतेही काम केले नाही. त्यामुळे खोटे पसरविण्यासाठी इतर राज्यांतून वरिष्ठ नेत्यांना गोव्यात बोलावावे लागले असल्याची टीका त्यांनी केली.
‘भाजप सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनांना गोवेकर बळी पडणार नाही याची खात्री आहे. पक्षाने काही काम केले असेल तरच मतदान करा असे सांगण्याचे धाडस केवळ ‘आप’ करते’ असे ते म्हणाले.