Goa Election 2022 : चिदंबरमजी रडगाणे बंद करा, काँग्रेस हीच भाजपसाठी आशा; अरविंद केजरीवाल यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 09:00 AM2022-01-18T09:00:40+5:302022-01-18T09:02:11+5:30
Goa Assembly Election 2022 : आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस हे गोव्यात भाजपविरोधी मतांचे विभाजन करायला आल्याचे चिदंबरम यांनी म्हटले होते.
पणजी : काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी रडगाणे बंद करावे. गोव्यातील लोक ज्यांच्याकडून अपेक्षा धरू शकतात अशाच लोकांना आता मतदान करणार आहेत, असा खोचक टोला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चिदंबरम यांना लगावला आहे.
आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस हे गोव्यात भाजपविरोधी मतांचे विभाजन करायला आल्याचे चिदंबरम यांनी म्हटले होते. तसे ट्वीट त्यांनी सोशल मीडियावर केले होते. त्यांच्या या ट्वीटला उत्तर देताना केजरीवाल यांनी उत्तरादाखल ट्वीट केले आहे. चिदंबरमजी रडणे बंद करा, गोव्यातील लोक अशाच लोकांना मते देतील, ज्यांच्याकडून ते अपेक्षा धरू शकतात. काँग्रेस ही भाजपसाठी आशा आहे. या पक्षाचे १७ पैकी १५ आमदार भाजपात गेलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसला गेलेले प्रत्येक मत हे भाजपला जात आहे, असे केजरीवाल म्हणाले.
मागील काही दिवसांपासून गोव्यातील राजकारणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस व तृणमूल काँग्रेसमध्ये ट्विटर युद्ध सुरू होते. पक्षाचे केंद्रीय नेते एकमेकांविरुद्ध टोलेबाजी करीत होते. आता त्यात आपचे सर्वोच्च नेते मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही उडी घेतली आहे.