Goa Election 2022: भाजप, काँग्रेस, टीएमसी कार्यकर्ते असलात तरी मते आम आदमी पक्षाला द्यावी: अरविंद केजरीवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 05:19 PM2022-02-04T17:19:04+5:302022-02-04T17:19:53+5:30
Goa Election 2022: भाजप आमदारांना मतदारांनी निवडून दिले, परंतु त्यांनी दहा वर्षांत घोटाळेच केले. सावंत सरकार घोटाळ्यांनी भरलेले आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : भाजप आमदारांना मतदारांनी निवडून दिले, परंतु त्यांनी दहा वर्षांत घोटाळेच केले. सावंत सरकार घोटाळ्यांनी भरलेले आहे, असा आरोप करीत आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घोटाळेबाजांना दूर ठेवण्यासाठी आम आदमी पक्षाला सत्तेवर येण्याची एकदा संधी द्यावी असे आवाहन केले.
पत्रकार परिषदेत केजरीवाल म्हणाले, ‘सावंत सरकारमध्ये एक मंत्री आहे, ज्याच्याविरुद्ध सेक्स स्कॅण्डलचा आरोप आहे. तसेच दुसऱ्यावर नोकरभरतीचा, तर तिसरा वीज घोटाळ्यात गुंतला आहे, चौथा मजूर घोटाळ्यात आणि पाचवा व्हेंटिलेटर खरेदी घोटाळ्यात आहे. भाजपने नेहमीच काँग्रेसवाल्यांना पाठीशी घातले. न्यायमूर्ती शहा आयोगाने ३६ हजार कोटींचा खाण घोटाळा उघडकीस आणला. परंतु भाजपने गेल्या दहा वर्षांच्या काळात खाण घोटाळ्यात गुंतलेल्या एकाही काँग्रेसी नेत्याविरुद्ध कारवाई करण्याचे धाडस दाखवले नाही. आप भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्यास कटिबद्ध आहे.’
केजरीवाल म्हणाले की, ‘नोकऱ्यांमध्येही वशिलेबाजी तसेच लाचखोरी चालू आहे. छोट्या व्यावसायिकांकडून परवान्यांसाठी लाच घेतली जात आहे. केवळ मुख्यमंत्र्यांच्या आणि आरोग्यमंत्र्यांच्या मतदार संघांमध्येच नोकऱ्यांची खिरापत वाटली जाते, हे गौडबंगाल आहे. आप सत्तेवर आल्यास नोकरभरती पारदर्शक असेल.’
केजरीवाल म्हणाले की, ‘दिल्लीत आपने ज्या गोष्टी करून दाखवल्या, त्या भाजपला शक्यच नाहीत. मोफत वीज देणे शक्य नसल्याचे भाजपने कबूल केले आहे. दिल्लीत आम्ही चांगल्या शाळा, मोहल्ला क्लिनिक, मोफत वीज दिली. गोव्यातही या सर्व गोष्टी आम्ही करणार आहोत. काँग्रेसकडे कोणताही अजेंडा नाही. मगोप किंवा गोवा फॉरवर्ड सरकार स्थापन करू शकणार नाही, हे त्यांच्या मतदारांनी ओळखावे. कोणालाही पक्ष सोडून आमच्याकडे या असे आम्ही म्हणत नाही. परंतु मतदारांनी या सर्व गोष्टींचा विचार करून ‘आप’ला एकदा संधी द्यावी.’