Goa Election 2022 : उत्पल पर्रीकरांच्या प्रचारामुळे बाबूश झाले होते बेचैन; पणजी मतदारसंघाबाबत भाजपकडून सोक्षमोक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 08:56 AM2022-01-21T08:56:06+5:302022-01-21T08:59:23+5:30
भाजपची उमेदवारी मिळणार म्हणून अन्य उमेदवारही प्रचार करत आहेत असे मतदार सांगत होते : बाबूश मोन्सेरात
पणजी : ‘भाजप मला उमेदवारी देणार याबाबत मी अत्यंत निश्चिंत होतो. पण अन्य मुद्दे होते. त्यामुळे मी प्रचार सुरू केला नाही. जेव्हा मी लोकांना भेटलो होतो, तेव्हा ते सांगत होते की आपल्याला भाजप उमेदवारी मिळेल म्हणून अन्य उमेदवारही फिरत आहेत. ही गोष्ट मला बेचैन करणारी होती,’ असे पणजी मतदारसंघाचे उमेदवार, आमदार बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले. तसेच मी आत प्रचार सुरू करणार असेही त्यांनी सांगितले. भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यात पणजी मतदारसंघात मोन्सेरात यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, भाजपचे नेते, उत्पल पर्रीकर या मतदारसंघात प्रचार करत आहेत.
यासंदर्भात बाबूश म्हणाले की, ‘माझा मतदारसंघ विचारात घेता काही मुद्दे सोडविणे मला कठीण होते. लोक मला प्रश्न करत होते. भाजपची उमेदवारी मिळणार म्हणून अन्य उमेदवारही प्रचार करत आहेत असे मतदार सांगत होते. ही गोष्ट बेचैन करणारी होती. म्हणून मी उमेदवार जाहीर होईपर्यंत प्रचाराला सुरुवात केली नाही.’
‘आमचे कार्यकर्ते खंबीर आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आम्ही शांत राहिलो. आम्हाला फार गडबड करावी लागली नाही. सक्षम कार्यकर्ते आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे आम्हांला पणजीत मोठ्या संख्येने मते मिळणार’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘भाजपला तिसवाडी मतदारसंघात पाच जागा मिळतील. कुंभारजुवे आणि सांताक्रुज मतदारसंघातील उमेदवारांची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत. त्याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. उमेदवार कोणीही असला तरी आम्ही त्याच्यासाठी काम करणार आहोत,’ असेही ते म्हणाले.
‘तू-तू, मै-मै’मध्ये रस नाही
‘भाजप पक्षाकडून २२ जागांचा दावा केला जात आहे. पण मला वाटते की त्यापेक्षा जास्त जागा निश्चितच मिळतील. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. पंचायत, जिल्हा पंचायत, महानगरपालिका निवडणुका असे आम्ही सर्व निवडणुका गांभीर्याने घेतो. आम्ही बिनविरोध कधी जिंकलो नाही. आम्ही सर्व पक्षांशी लढा देऊनच जिंकलो आहोत. मला तू-तू, मै-मैमध्ये अजिबात रस नाही,’ असेही ते म्हणाले.