Goa Election 2022 : बाबूश यांनी केला होता सरकार पाडण्याचा प्रयत्न; दीपक पाऊसकर यांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 06:33 PM2022-01-24T18:33:25+5:302022-01-24T18:34:04+5:30
Goa Election 2022 : सरकार सावंत नाही, तर मॉन्सेरात चालवत असल्याचीही पाऊसकर यांची टीका.
पणजी : बाबूश मोन्सेरात व गोवा फॉरवर्ड २०१९ साली सावंत सरकार पाडण्यासाठी कट- कारस्थाने करीत होते, असा गौप्यस्फोट माजी सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी केला आहे. आज सरकार मुख्यमंत्री सावंत नव्हे, तर बाबूश मोन्सेरात हेच चालवत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
पाऊसकर म्हणाले की, ‘सरकार पाडण्याची कारस्थाने करूनही भाजप बाबूशला डोक्यावर घेत आहे. पक्षाने माझे तिकीट कापले तरी माझी जनता माझ्यासोबत आहे. त्यावेळी सरकार पाडण्याची कारस्थाने शिजत असल्याचे मला कळल्यावर मुख्यमंत्र्यांच्या कानावर मी ही गोष्ट घातली. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भाजपत घेतले आणि सरकार बळकट केले. बाबूश, गोवा फॉरवर्डचे नेते मॅच बघण्यासाठी म्हणून विदेशात गेले होते; परंतु बाबूश विदेशातून सावंत सरकार पाडण्याची कट कारस्थाने करीत होते.’
सरकारात मंत्री असूनही भाजपने येत्या विधानसभा निवडणुकीसाठी पाऊसकर यांचा पत्ता कापला. सावर्डेत पक्षाने माजी आमदार गणेश गांवकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पाऊसकर यांनी मंत्रिपदाचा तसेच आमदारकीचा राजीनामा देऊन पक्षाला सोडचिठ्ठी देत अपक्ष रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे.