Goa Election 2022: भाजपची धास्ती वाढली! सहानुभूतीचा लाभ मिळविण्याचा उत्पल पर्रिकरांचा प्रयत्न; बाबूश धोक्यात?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 04:36 PM2022-02-06T16:36:43+5:302022-02-06T16:41:12+5:30

Goa Election 2022: माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र असूनही भाजपने तिकीट नाकारल्याने उत्पलला पणजीत सहानुभूती मिळतेय.

goa election 2022 bjp fear increased utpal parrikar attempt to gain sympathy | Goa Election 2022: भाजपची धास्ती वाढली! सहानुभूतीचा लाभ मिळविण्याचा उत्पल पर्रिकरांचा प्रयत्न; बाबूश धोक्यात?

Goa Election 2022: भाजपची धास्ती वाढली! सहानुभूतीचा लाभ मिळविण्याचा उत्पल पर्रिकरांचा प्रयत्न; बाबूश धोक्यात?

Next

पुजा नाईक प्रभूगावकर, लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी : भाजपने तिकीट नाकारल्याने पणजीतून अपक्ष उभे राहिलेले माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांंचे पुत्र उत्पल पर्रीकर हे भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांंना जोरदार टक्कर देत आहेत. त्यासाठी उत्पलचे समर्थक पणजीत सहानुभूतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मनोहर पर्रीकर या नावाभोवती असलेल्या सहानुभूतीचा लाभ उत्पलला मिळेल काय? हे मतदार ठरवतील. पण उत्पलचे सध्याचे प्रयत्न व भाजप मतांमधील संभाव्य फूट हे गृहितधरता बाबूश मोन्सेरात देखील धोक्यात येऊ शकतात, अशी स्थिती पणजीत आली आहे.

मोन्सेरात यांना बदलत्या वातावरणाची कल्पना आलेली आहे. त्यामुळे ते पणजी मतदारसंघात ठाण मांडून आहेत. बाबूशने अजून ताळगावकडे लक्ष वळवलेले नाही. पणजी मतदारसंघात यापूर्वी एकदा बाबूशने पराभवाचे पाणी चाखलेले आहे. पणजीतील मतदारांना गृहित धरता येत नाही, याची बाबूशला पूर्ण कल्पना आहे. पणजी हा सुशिक्षित मतदारांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे उत्पलचे उच्च शिक्षण व स्वच्छ चारित्र्य हाच उत्पलच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनवला आहे. १९९४ साली मनोहर पर्रीकर प्रथम जिंकले होते, तेव्हा पर्रीकर यांनीही आयआयटी शिक्षण व स्वच्छ वर्तन हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा बनविला होता.

माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांंचे पुत्र असूनही भाजपने तिकीट नाकारल्याने उत्पलला पणजीत सहानुभूती मिळतेय. सारस्वत समाजाची बहुतांश मते उत्पल यांना मिळण्याची दाट शक्यता असल्याने बाबूश यांची कसोटी आहे. बाबूशने बहुजन समाजातील मतांवर भर दिलेला आहे. उच्चशिक्षित ख्रिस्ती धर्मियांची थोडी मते काँग्रेसलाही मिळणार आहेत. बाबूश व उत्पल यांंनी सध्या घरोघरी जाऊन मतदारांंच्या भेटी घेण्याचा सपाटा लावला आहे. 

आमदार म्हणून आपण काय काम केले हे बाबूश मतदारांंना पटवून देत असले तरी त्यांंच्याविरोधात जे विविध गुन्हे नोंद आहेत, त्याचीच चर्चा मतदारांंमध्ये अधिक आहे. पणजीला कथित गुन्हेगारी पार्श्वभूमी लाभलेला, विकासाच्या नावाने शहराचे काँक्रिटीकरण करणारा, मांंडवीतून १०० दिवसांंत कॅसिनो हटवू असे खोटे आश्वासन देणारा आमदार हवा आहे का? असा प्रश्न उत्पल व त्याचे कार्यकर्ते मतदारांना विचारत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही प्रमुख कार्यकर्ते उत्पलचा प्रचार करत आहेत. रत्नाकर लेले, प्रणव लेले आदी अनेक स्वयंसेवक उत्पलच्या मागे आहेत. सुभाष वेलिंगकर यांचीही नुकतीच उत्पलने भेट घेतली. शैलेंद्र वेलिंगकर यांचा तर उत्पललाच पाठींबा आहे. 

चर्चा उत्पल-बाबूश अशीच

काँग्रेसने एल्वीस गोम्स यांंना तिकीट दिले आहे. त्यामुळे पणजीत थेट लढत ही भाजप व काँग्रेसमध्येच असल्याचे बाबूश म्हणत आहेत. मात्र, खरी लढत बाबूशविरुद्ध उत्पल आहे हे राजकीय विश्लेषकांनाही ठाऊक आहे. बाबूश यांंच्या विधानावरून त्यांंनी उत्पल यांंची किती धास्ती घेतली आहे, हे स्पष्ट होते. बाबूश व उत्पल यांंच्यामुळे भाजपच्या मतांंचे विभाजन झाले आहे. दुसरीकडे काँग्रेसने तिकीट नाकारल्याने संतापलेल्या माजी महापौर उदय मडकईकर यांंनी उत्पल यांंना थेट पाठिंंबा दिल्याने परिणामी काँग्रेसचीही मते फुटणार आहेत.
 

Web Title: goa election 2022 bjp fear increased utpal parrikar attempt to gain sympathy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.