Goa Election 2022: भाजपची डोकेदुखी वाढणार! गोव्यात बड्या नेत्याचे उघडपणे बंड; काँग्रेसच्या दिगंबर कामतांना खुला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 04:15 PM2022-01-16T16:15:57+5:302022-01-16T16:17:18+5:30
Goa Election 2022: भाजप नेत्याच्या उघड बंडामुळे आता पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मडगाव : भाई नायक यांनी उघडपणे आता बंडाचा पवित्रा घेतला असून, आपला पाठिंबा मडगावात दिगंबर कामत यांना असल्याचे सांगितले आहे. कामत यांना जिंकून आणूच, असेही ते म्हणाले. एका खासगी चॅनलकडे त्यांनी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाई हे भाजपाचे मडगावातील एक ज्येष्ठ नेते असून, माजी मंत्री तथा मडगावचे माजी आमदार बाबू नायक यांचे ते चिरंजीव आहेत. मडगावातील अनेक सामाजिक संस्थेशीही ते संलग्नित आहेत. भाई यांच्या या भूमिकेमुळे आता भाजप पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. आपण अजूनही भाजप सोडली नाही, असेही नायक म्हणतात.
२००५ सालापासून मडगावात भाजपचा आमदार झालेला नाही. याची कदाचित दोन कारणे असावीत. एक तर कामत हे पॉवरफुल असावे वा भाजपाकडे त्या ताकदीचा उमेदवार नसावा, असेही त्यांनी सांगितले. मडगावातून तीनदा कामत यांच्या विरोधात शर्मद पै. रायतूरकर व एकदा रुपेश महात्मे यांना उमेदवारी दिली. हे दोघेही पक्षनिष्ठ कार्यकर्ते आहेत. मडगावात भाजपचे कार्यकर्ते कमी व नेते जास्त अशी स्थिती आहे, असे नायक उद्गारले. भाजप चुकत आहे. मी पक्ष सोडलेला नाही, त्यांना नको असेल तर ठीक आहे, असेही ते म्हणाले.
डॉ. देशप्रभू देसाई यांना भाजपने उमेदवारी दिली होती. मात्र, त्यावेळी मंडळाला विश्वासातही घेतले गेले नाही. आपण वैयक्तिक कारणास्तव मंडळाच्या बैठकीला हजर राहू शकलो नाही. मात्र, बैठकीत दोन सदस्य बोलण्यास उभे राहिले असता त्यांना गप्प करण्यात आले. बाबू आजगावकर हे आमचे फॅमिली सदस्य आहेत. पेडणेत नको मडगावात उभे राहा, असे त्यांना पक्षाला सांगितले असावे. आपला पाठिंबा हा दिगंबर कामत यांना यापूर्वीच आपण जाहीर केलेला आहे. भाजप चुकला आहे, त्यासंबधी आपण कुठेही खुलेआम चर्चा करण्यास तयार आहे. आपण त्याला पेडणेत अपक्ष राहतो, का अन्य कुठल्या पक्षातर्फे उभा राहतो, यावर चर्चा करू.