Goa Election 2022: भाजपचे टेन्शन वाढले! पणजीत उत्पल पर्रिकरांना पाठिंबा वाढतोय; बाबूश मोन्सेरातसमोर कडवे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 10:12 AM2022-01-26T10:12:39+5:302022-01-26T10:13:15+5:30
Goa Election 2022: उत्पलची उघड बंडखोरी तसेच वेगवेगळ्या घटकांकडून त्यांना मिळणारा वाढत पाठिंबा पाहता बाबूश यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे.
किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : तिसवाडी तालुक्यात बंडखोरीचा फटका भाजप उमेदवारांनाच अधिक जाणवणार आहे. कुंभारजुवे आणि सांताक्रूझ मतदारसंघांमध्ये भाजपला उमेदवार जाहीर करण्यास लागलेल्या विलंबास बंडखोरीची भीती हेच कारण असल्याचे मानले जाते. पणजीत भाजपने बाबुश मोन्सेरात यांना उमेदवारी दिल्यानंतर उत्पल पर्रीकर यांनी बंड करीत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार आहेत. सिध्दार्थ कुंकळ्येंकर वगैरे बाबुश यांच्या विरोधात आहेत.
काँग्रेसने तिकीट नाकारलरेले माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक उदय मडकईकर यांनी उत्पल यांना पाठिंबा जाहीर केला आहे. उत्पल यांनी माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली व त्यांचेही आशीर्वाद घेतले आहेत. उत्पलची उघड बंडखोरी तसेच वेगवेगळ्या घटकांकडून त्यांना मिळणारा वाढत पाठिंबा पाहता बाबूश यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे.
जेनिफर यांच्यासमोर आव्हान
ताळगाव मतदारसंघात जेनिफर मोन्सेरात यावेळी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत, परंतु भाजपचे ताळगाव मंडल कार्यकर्ते जेनिफर यांच्यासाठी तसे अनुकूल नाहीत. दत्तप्रसाद नाईक व मंडळी उघडपणे बंड दाखविले आहे. दत्तप्रसाद यांनी गेल्या पाच वर्षात लोकांचे विषय घेऊन विविध आंदोलने केली. या मतदारसंघात बाबूश मोन्सेरात यांच्याप्रती असलेल्या व्यक्तीनिष्ठेच्या जोरावर गेल्यावेळी बाजी मारलेल्या जेनिफर यांना यावेळी विजयासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागणार आहेत. कॉंग्रेसतर्फे माजी महापौर टोनी रॉड्रिग्स यांनी प्रचारात बरीच आघाडी घेतली आहे. आम आदमी पक्षातर्फे युवा नृत्य शिक्षिका सिसील रॉड्रिग्स रिंगणात आहेत. त्यांनीही बराच जोर लावला आहे. दत्तप्रसाद यांचा २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत केवळ १०५० मतांनी पराभव झाला होता. २०१७ मध्येही भाजपने त्यांना पुन: तिकीट दिले, परंतु या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता.
कुंभारजुवे, सांत आंद्रेत उमेदवारीसाठीच टशन
कुंभारजुवें मतदारसंघात आमदार पांडुरंग मडकईकर यांना भाजपने डावलल्यास ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरतील हे स्पष्ट आहे. शिवाय रोहन हरमलकर यांनीही भाजपने आपल्याला तिकीट न दिल्यास बंडाची भूमिका जाहीर केली आहे. या मतदारसंघात बंडखोरीच्या भीतीनेच भाजपला उमेदवार जाहीर करण्यास विलंब लागला.
तर सांत आंद्रे मतदारसंघात भाजप मंडलचे अनेक कार्यकर्ते रामराव वाघ यांच्यासोबत आहेत. वाघ यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन आपमध्ये प्रवेश केला आणि ते आपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. आमदार फ्रान्सिस सिल्वेरा हे केडरचे नाहीत. काँग्रेसमधून उमेदवार आयात केल्याने भाजपचे निष्ठावान आणि केडरचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत नाहीत.
तर सांताक्रूझ मतदारसंघ कधीही भाजपकडे नव्हता. या मतदारसंघात काँग्रेसने सहा वेळा विजय प्राप्त केलेला आहे. भाजपने या मतदारसंघातही अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. विद्यमान आमदार टोनी फर्नांडिस यांना तिकीट नाकारल्यास ते काय भूमिका घेतील हे पाहावे लागेल. भाजप उमेदवारीसाठी जि. पं. सदस्य गिरीश उस्कैकर, पक्षाच्या ओबीसी विभागाचे नेते अनिल होबळे आदी दावेदार आहेत.