Goa Election 2022: राज्यातील अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्रातून चालना देणार; नव्या पक्षाने मांडले गोव्याचे व्हिजन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 10:06 AM2022-01-18T10:06:44+5:302022-01-18T10:09:37+5:30
Goa Election 2022: राजकारणात घुसलेल्या जमीन माफियांकडून शेतकऱ्यांना संपविण्याचा डाव आहे, असे आरोप करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : रेवल्युशनरी गोवन्स पक्षाने कृषी व्हिजन जाहीर केले आहे. यात कृषी क्षेत्रातून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे उद्दिष्ट आहे असे, पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी सोमवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्यातील खाजन जमिनींचे रक्षण करण्यासाठी युवांना कृषी खात्यात आणायचे कधी प्रयत्न झाले नाहीत. राज्यातील शेती नष्ट करण्यात आली. याला सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. राजकारणात घुसलेल्या जमीन माफियांकडून शेतकऱ्यांना संपविण्याचा डाव आहे, असे आरोप परब यांनी केले.
गोव्याचे रक्षण करण्यासाठी कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. राज्यातील शेती लागवडीखाली आणली पाहिजे. २०३० पर्यंत राज्यातील शेती पूर्णपणे सेंद्रिय करण्याचा उद्देश आहे. यासाठी शेतीत युवांना प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती परब यांनी दिली. राज्यात प्रशिक्षण केंद्रे सुरू केली जातील. शेतीला व्यावसायिक रूप दिले जाईल. उत्पादनाचे ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग करण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात येईल. शेतीक्षेत्र हे उद्योग क्षेत्र म्हणून विकसित झाले पाहिजे. मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत जे युवा शेती करू इच्छितात त्यांना कर्ज दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
खाजन जमिनी पुन्हा लागवडीयोग्य करण्याचा उद्देश आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक गावात कृषी सेवक असेल. यामुळे शेतकऱ्यांना मुख्य कार्यालयात ये-जा करून वेळ वाया घालवावा लागणार नाही. बांधला तडे पडून खारट पाणी शेतात घुसल्याने शेतीचे नुकसान होते. मुद्दामहून हे प्रकार केले जातात’ असे परब म्हणाले.