Goa Election 2022: “गोवेकरांना अल्पसंख्याक बनवण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत कुठल्याही थराला जाऊ शकतात”
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 05:22 PM2022-01-17T17:22:49+5:302022-01-17T17:23:52+5:30
Goa Election 2022: भाजपची पुन्हा सत्ता आल्यास ते गोव्यात गोंयकारांनाच अल्पसंख्याक बनवतील, असा दावा करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मडगाव : गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सांगितले की, भाजप सरकारने गोंयकारांचा टॅग बिगर गोमंतकियांना देण्यासाठी ‘भूमिपुत्र अधिकारिणी विधेयक’ आणले होते, जे विरोधकांनी आवाज उठवल्यानंतरच रद्द करण्यात आले. पण भाजपची पुन्हा सत्ता आल्यास हे विधेयक कायद्यात रुपांतरीत करून ते गोव्यात गोंयकारांनाच अल्पसंख्याक बनवतील.
फातोर्डा येथील जनमत कौल दिनाच्या निमित्ताने ओपिनियन पोल चौकात स्मारकाला पुष्पहार अर्पण करून जनमत कौल दिन साजरा केला. त्यावेळी सरदेसाई बोलत होते. त्यावेळी नगराध्यक्ष लिंडन पेरेरा, नगरसेवक जॉनी क्रास्टो आणि ज्येष्ठ पत्रकार अनिल पै उपस्थित होते. डॉ. जॅक सिक्वेरा यांनी गोव्याची अस्मिता जपली होता. तसेच गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण रोखण्यात मोठी भूमिका बजावली होती. त्यांच्यासोबत शाबू देसाई, उल्हास बुयांव, रवींद्र केळेकर, अड. उदय भेंब्रे, चंद्रकांत केणी व इतरांनी गोव्याच्या अस्मितेसाठी लढा दिला. यासाठी विधानसभा संकुलात डॉ. सिक्वेरा यांचा पुतळा बसवायचा होता, पण भाजपने तो बसविला नाही, असे सरदेसाई यांनी सांगितले.
ते म्हणाले की, भाजपने हा प्रस्ताव फेटाळल्यानंतर गोवा फॉरवर्ड पक्षाने डॉ. सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला. दोडामार्ग पंचायत आणि नगरपालिकेने गोव्याचा भाग होण्यासाठी ठराव घेतले होते. या सरकारवर विश्वास ठेवता येत नाही. कारण गोव्याच्या लोकांना अल्पसंख्याक बनवण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कुठल्याही थराला जाऊ शकतात. ही निवडणूक आणखी एक ‘ओपिनियन पोल’ असेल, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.