Goa Election 2022: काँग्रेसकडून रिजेक्टेड उमेदवार निवडणूक रिंगणात; मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 10:56 PM2022-02-07T22:56:28+5:302022-02-07T22:57:49+5:30
Goa Election 2022: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला २२ जागा हे घोषवाक्य सत्यात उतरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मडगाव : काँग्रेसने रिजेक्टेड उमेदवार पुन्हा उभे केले आहेत. दोन-तीन चेहरे सोडले तर तेच चेहरे असून, फिक्सिंग करुन त्यांना तिकिटे दिली आहेत. दिगंबर कामत यांना हरविण्यासाठीच आम्ही बाबू आजगावकर यांना मडगावात उमेदवारी दिल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
दक्षिण गोवा जिल्हा भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सासष्टीत या खेपेला कमळ फुलेल, असे सांगून आगामी सरकार हे भाजपचे असेल. पूर्ण बहुमताचे सरकार स्थापनेसाठी मतदारांनी भाजपला मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले. पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, दामू नाईक, सावियो रॉड्रिगीस, उल्हास तुयेकर, दामोदर बांदोडकर, अँथनी बार्बाेझ, दत्ता बोरकर हे सासष्टीतील मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार व उर्फान मुल्ला हे पत्रकार परिषदेत हजर होते.
सासष्टीत भाजपला अनुकूल वातावरण आहे. बाबू आजगावकर हे आगामी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असतील, दामू नाईक हेही मंत्री असतील, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले. सालसेत मिशनची यावेळी गरज दिसली नाही. येथील मतदार भाजप समवेत आहेत. आमचे काही उमेदवार नवखे असले तरी ते विजयी होणार, त्याबाबत कुणी आश्चर्य वाटून घेऊ नये.
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पुढचे सरकार हे भाजपचेच असून, प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री असतील, असे सांगितले. मडगावकरांना बदल हवा आहे, या मतदारसंघात विकास झालेला नाही. आपण पेडणे नंबर १ मतदारसंघ केला, मडगावही तसाच व्हायला पाहिजे, मडगावात आपल्याला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे ते म्हणाले. दामू नाईक यांनी २०२२च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला २२ जागा हे घोषवाक्य सत्यात उतरेल, असे सांगितले. पूर्ण बहुमताचे सरकार असेल. राज्याला स्थिर सरकार पाहिजे, भाजप ते देईल, असे सांगितले.