Goa Election 2022: “मनोहर पर्रीकर हे आजच्या आधुनिक गोव्याचे शिल्पकार”: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 04:15 PM2022-02-06T16:15:18+5:302022-02-06T16:17:33+5:30
Goa Election 2022: आप व तृणमूलसारख्या पक्षनेत्यांना पार्सल करून घरी पाठवावे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
डिचोली: ‘दिवंगत मनोहर पर्रिकर हे आधुनिक गोव्याचे निर्माते आहेत. त्यांच्यानंतर प्रमोद सावंत यांनी अनेक क्षेत्रांत विकासाला चालना दिली’, असे प्रतिपादन भाजप गोवा प्रभारी व महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. डिचोलीतील शेट्ये प्लाझा येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांशी त्यांनी संवाद साधला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘राज्याच्या विकासाचा आलेख खूप मोठा आहे. काँग्रेसचेही डबल इंजिन सरकार होते. त्यांनी काहीच केले नाही. आज तृणमूल काँग्रेस, आप खोटी आश्वासने देत आहेत. तृणमूलला भुलून अनेक जण वाहत गेले. गोव्यात तृणमूलचा फॉर्म्युला चालू शकत नाही, हे लक्षात येताच अनेक जण दूर झालेत, असे फडणवीस यांनी सांगितले. ‘मगो पक्षाला तृणमूलच्या काळ्याकुट्ट व लोकशाही मान्य नसलेल्या लोकांबरोबर जाणे महागात पडणारे आहे. आज मगोबदद्ल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर तृणमूलचा ध्येय मगोला मान्य असेल तर त्यांना जनता अजिबात मत देणार नाही’ असे फडणवीस म्हणाले.
आप व तृणमूलसारख्या पक्षनेत्यांना पार्सल करून घरी पाठवावे असे आवाहन फडणवीस यांनी केले. ‘राजकारणातून नेता अंतिम क्षणापर्यंत खुर्ची सोडत नाहीत. मात्र, राजेश पाटणेकर यांनी स्वतःहून नवा चेहरा द्या, असे आवाहन केले होते. आता मात्र त्यांनी रिंगणात उतरून योग्य निर्णय घेतला, याचे समाधान त्यांना आहे. ते मंत्री होतील’, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. राजेश पाटणेकर म्हणाले, आगामी काळात केंद्र व राज्यात भाजप विकासाला मोठी चालना देणार आहे’, असा विश्वास राजेश पाटणेकर यांनी व्यक्त केला.
पाच वर्षे गोव्याच्या समृद्धीची
मागील १० वर्षे गोव्याच्या विकासाची होती. पुढील पाच वर्षे गोव्याच्या समृद्धीची असल्याने होणारी निवडणूक गोव्यात परिवर्तन घडवणारी निवडणुक आहे. त्यामुळे मतदारांनी भाजपासोबत राहण्याचे आवाहन भाजपचे गोवा प्रभारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शिवोली मतदार संघातील वेर्ला-काणका पंचायत क्षेत्रात कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी भाजपाचे शिवोलीतील उमेदवार दयानंद मांद्रेकर मंडल अध्यक्ष मोहन दाभाळे तसेच इतर उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काही कार्यकर्त्यांनी भाजमध्ये प्रवेश केला.
यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करताना पैशांच्या जोरावर शिवोलीतील मतदारांना विकत घेणे शक्य होणार नसून येथील मतदार भाजपा उमेदवारासोबत कायम पाठिशी राहणार, असा दावा फडणवीस यांनी केला. पेडणेतील मोपामुळे पर्यटकात वाढ होणार आहे. मोपामुळे तसेच वाढणाऱ्या पर्यटकांमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होतील. त्यातून नवीन गोव्याची स्वप्नपूर्तीकडे वाटचाल होईल, असेही ते यावेळी म्हणाले. दिगंबर कामत यांचे सरकार घोटाळ्यांचे सरकार होते. स्वत:ची घरे भरण्यासाठी सत्ता हवी असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.