Goa Election 2022: मतदारांची अंतिम यादी जाहीर; गोव्यात २६,२९७ नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 09:02 AM2022-01-25T09:02:56+5:302022-01-25T09:03:31+5:30
Goa Election 2022: नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी आयोगाने मोठ्या प्रमाणात जागृती उपक्रम हाती घेतले.
किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : १८ ते १९ वयोगटातील २६ हजार २९७ नवमतदार युवक-युवती येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण १.६७ टक्के एवढे आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या ५ जानेवारी रोजी मतदारांची अंतिम यादी जाहीर केली. त्यात ३०,५९९ नवीन नावे जोडली गेली आहेत.
अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी आयोगाने मोठ्या प्रमाणात जागृती उपक्रम हाती घेतले. महाविद्यालयांमध्ये वेळोवेळी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आली. तसेच मतदानासाठी प्रोत्साहनार्थ विविध कार्यक्रम करण्यात आले. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आयोग सातत्याने प्रयत्न करीत आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते नवीन मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उत्सूक असतातच त्याबाबत वाद नाही, शिवाय आयोगाची जागृती आहेच. यावेळी मतदारयाद्या निर्दोष आहेत. बहुसंख्य मतदारसंघांमध्ये रंगदार लढती होणार आहेत. त्यामुळे २०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी जास्त मतदान होईल, अशी अपेक्षा आहे.
२०१२ साली ८१.७३ टक्के मतदान झाले होते. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत ८३ टक्के मतदान झाले. येत्या निवडणुकीतही आयोगाने ९० टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाचे उद्दिष्ट ठेवले आहे. लोकांना मतदानास प्रोत्साहन देण्यासाठी आयकॉन नेमण्यात आले. वेगवेगळ्या जिंगल तयार करण्यात येणार आहेत. पिंक बूथची संकल्पना राबवून नवमतदार युवतींना मतदानासाठी प्रोत्साहित केले जाईल. या सर्व उपक्रमांमुळे तसेच राजकीय पक्षांच्या प्रयत्नांमुळे मतदानाचे प्रमाण वाढेल, अशी अपेक्षा आहे.
मडगावात कार्यक्रम
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मडगाव येथील रवींद्र भवनमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून निवडक नवमतदारांना या कार्यक्रमात मतदार ओळखपत्रे दिली जातील. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई प्रमुख पाहुणे म्हणून, मुख्य सचिव परिमल राय प्रमुख अतिथी म्हणून व राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त डब्लू. व्ही. रमणमूर्ती एक खास निमंत्रित म्हणून उपस्थित असतील.