Goa Election 2022: गोव्याची संस्कृती, वारसा टिकवणार; तृणमूल काँग्रेसला विश्वास, भाजपवर जोरदार टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 10:27 PM2022-02-03T22:27:55+5:302022-02-03T22:29:12+5:30
Goa Election 2022: गोवा तृणमूल काँग्रेसने जाहीरनामा २०२२ प्रकाशित केल्यानंतर लगेचच गोव्याची संस्कृती, वारसा आणि पर्यटन रक्षण करण्याच्या पक्षाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : गोवा तृणमूल काँग्रेसने जाहीरनामा २०२२ प्रकाशित केल्यानंतर लगेचच गोव्याची संस्कृती, वारसा आणि पर्यटन रक्षण करण्याच्या पक्षाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. तृणमूलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पवन वर्मा, गोवा प्रदेश उपाध्यक्ष शिवदास नाईक आणि सचिव आरमांदो गोन्साल्विस यांनी गोव्याची सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण संस्कृती टिकवून ठेवण्याचे आश्वासन पणजीतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिले.
केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने खेळलेल्या निर्णायक राजकारणावर टीका करताना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पवन वर्मा म्हणाले, ‘गोव्याला एक अद्वितीय संस्कृती आणि वारसा आहे. गोव्याची संस्कृती, गोव्याचा आत्मा, गोंयकारपण यांचे वेगळेपण जपण्यासाठी संस्थात्मक पावले उचलण्याचा आमचा प्रस्ताव आहे. भाजपकडे सांस्कृतिक कीर्ती स्तंभांचे मॉडेल आहे जे गोव्याच्या दोलायमान बहुलतेच्या विरोधात आहे.’ ते पुढे म्हणाले, ‘काँग्रेसची संस्कृतीबद्दल संस्थात्मक उदासीनता आहे.’ वर्मा यांनी हिंदू धर्मावर भाजपची मक्तेदारी आहे का?, असा सवाल करतानाच सांगितले की, गोव्याच्या अस्मितेला धार्मिक विभाजन आणि द्वेषाच्या नजरेतून पाहिल्यास त्यावर मोठा आघात होईल. भाजपने सांस्कृतिक कीर्ती स्तंभाची कल्पना केली आहे. ते त्यांच्या अल्पकालीन राजकीय फायद्यासाठी हिंदू धर्माचा वापर करत आहेत. मात्र, ते स्वतः हिंदुत्ववादी नाहीत.’
गोव्यासाठी ‘टीएमसी’च्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार करताना वर्मा म्हणाले, ‘आमचा विश्वास आहे की, राजकारण येते आणि जाते, परंतु गोव्याची संस्कृती आणि आत्मा, सहअस्तित्व, बहुलता, सौहार्द, मैत्री आणि विश्वास, आदी टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याला वाढू देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.’ शिवदास नाईक म्हणाले, ‘मला हे घोषित करताना आनंद होत आहे की, ‘टीएमसी’ने गोव्यातील सर्व वारसा स्थळांच्या जतन आणि देखभालीसाठी २५ लाख रुपये निधी देण्याचे वचन दिले आहे. टीएमसी’ सत्तेत आल्यानंतर ‘हॉटस्पॉट्स’ ओळखून त्यांना पर्यटन स्थळांमध्ये विकसित करेल., असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकताना आरमांदो गोन्साल्विस म्हणाले, ‘गोव्याचे पर्यटन क्षेत्र हे कॅसिनो आणि बारच्या समानार्थी बनले आहे, परंतु आपण आपले लक्ष गोमंतकीयांच्या तत्त्वज्ञानाच्या रक्षणाकडे वळवले पाहिजे. आम्ही गोवा वेल्हा आणि आगशी हे क्षेत्र ‘सांस्कृतिक हॉटस्पॉट’ बनवू शकतो.’