Goa Election 2022 : "गृहलक्ष्मी, युवा शक्ती आणि माझे घर, मालकी हक्क योजना तृणमूल प्रभावीपणे राबविणार"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 18:47 IST2022-01-24T18:47:35+5:302022-01-24T18:47:57+5:30
Goa Election : माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा पक्षाचे उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांची ग्वाही.

Goa Election 2022 : "गृहलक्ष्मी, युवा शक्ती आणि माझे घर, मालकी हक्क योजना तृणमूल प्रभावीपणे राबविणार"
पणजी : गोव्यात तृणमूल काँग्रेसचे सरकार स्थापन होताच ‘गृहलक्ष्मी, युवा शक्ती आणि माझे घर, मालकी हक्क’या योजना प्रभावीपणे राबविल्या जातील, अशी ग्वाही माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा पक्षाचे उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांनी दिली. "राज्यात ‘टीएमसी’चे सरकार स्थापन होताच सर्व तिन्ही योजनांची अंमलबजावणी होईल," असं ते यावेळी म्हणाले. तृणमूल प्रवेशानंतर गोव्यात प्रथमच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
सिन्हा केवळ या योजनांच्या व्यवहार्यतेबद्दलच बोलले नाहीत तर निधीच्या स्रोताबाबतही स्पष्ट केले आणि करदात्यांवर कोणताही अतिरिक्त बोजा पडणार नसल्याचे तसेच या योजना राबविण्यासाठी राज्याला आणखी कर्ज घ्यावे लागणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. सिन्हा म्हणाले, ‘या योजनांची संपूर्ण जबाबदारी मी घेतो आणि त्यांची अंमलबजावणी होईल, याची खात्री करून घेण्यासाठी तृणमूल सरकार सत्तेत आल्यानंतर मला तीन ते सहा महिने गोव्यात बसावे लागले तरी चालेल.’
अर्थमंत्री म्हणून आपला अनुभव मांडताना सिन्हा यांनी या तीन योजनांसाठी निधी कसा उभारला जाईल, हे विषद करून सांगितले. ते म्हणाले, ‘या तीन योजना मिळून सुमारे ३,३३० कोटी रुपये खर्च होतील. वित्त आयोग आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या निकषांच्या संदर्भात गोव्याकडे आधीच २,१०० कोटी रुपयांची अतिरिक्त वित्तीय तरतूद आहे. २५ हजार कोटी रुपयांच्या बजेटमधून ही रक्कम या कल्याणकारी योजनांवर खर्च करता येईल.’
या योजनांसाठी पैसे काढू
‘आम्ही सध्याच्या अर्थसंकल्पातून या योजनांसाठी पैसे काढू. त्यासाठी करदात्यांवर कोणतेही अतिरिक्त कर लावले जाणार नाहीत किंवा आम्ही या योजनांच्या अंमलबजावणीसाठी कोणतेही अतिरिक्त कर्ज घेणार नाही. स्वतःचे घर कोणाला नको असते? तरुणांना २० लाख रुपयांचे कर्ज दिले जात आहे. जेणेकरून ते स्टार्ट-अप किंवा त्यांच्या स्वतःच्या व्यवसायात गुंतवणूक करू शकतील. महिलांना गृहलक्ष्मीच्या माध्यमातून पैसे हातात येतील,’ असंही त्यांनी नमूद केलं.
शाश्वत शेती, खाण यावर लक्ष केंद्रीत करू
शाश्वत शेती आणि शाश्वत खाण व्यवसायावरही पक्ष लक्ष केंद्रीत करेल. जे दोन्ही गोव्याच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण आहेत, असे ते म्हणाले. ‘डबल इंजिन’ या शब्दावरून भाजपवर टीका करताना ते म्हणाले, ‘आज मोदी राज्य सरकारसंदर्भात दुहेरी इंजिनबद्दल बोलत आहेत, उद्या ते पंचायतींच्या संदर्भात तिहेरी इंजिनबद्दल बोलतील. हे कसे चालेल?’