Goa Election 2022: खबरदार! प्रचार कराल तर नोकरी गमवाल; ‘त्या’ कर्मचाऱ्यांना गोवा सरकारचे कडक निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 09:59 AM2022-01-20T09:59:29+5:302022-01-20T10:00:39+5:30

Goa Election 2022: प्रचार करताना आढळल्यास कामावरून काढून टाकले जाईल, असे परिपत्रक काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

goa election 2022 if you preach you will lose your job strict instructions of goa govt to anganwadi employees | Goa Election 2022: खबरदार! प्रचार कराल तर नोकरी गमवाल; ‘त्या’ कर्मचाऱ्यांना गोवा सरकारचे कडक निर्देश

Goa Election 2022: खबरदार! प्रचार कराल तर नोकरी गमवाल; ‘त्या’ कर्मचाऱ्यांना गोवा सरकारचे कडक निर्देश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी : आगामी विधानसभा निवडणुकीत कोणताही पक्ष वा उमेदवारासाठी प्रचार न करण्याचे कडक निर्देश अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. प्रचार करताना आढळल्यास कामावरून काढून टाकले जाईल, असे परिपत्रक महिला आणि बालविकास खात्याने जारी केले आहे. मात्र, या पत्रकाला जोरदार आक्षेप नोंदविण्यात आला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून सरकारविरोधी प्रचार होण्याची भीती असल्यानेच हे परिपत्रक जारी केल्याचा आरोप करत ॲड. हृदयनाथ शिरोडकर यांनी पत्रकाचा निषेध केला आहे. 

राज्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने विविध पक्षांकडून आणि उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. काही ठिकाणी शिक्षकांना उमेदवार प्रचारात गुंतवत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या अनुषंगाने आता महिला आणि बालविकास खात्याने परिपत्रक जारी केले आहे. 
खात्याच्या संचालक दीपाली नाईक यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अंगणवाडी कर्मचारी आणि हेल्पर यांनी कुठल्याही निवडणूक प्रचारात सहभागी होऊ नये. एखादा अंगणवाडी कर्मचारी/हेल्पर कुठल्याही पक्षाचा वा उमेदवाराचा प्रचार करताना आढळल्यास त्यास तातडीने कामावरून काढून टाकले जाईल. 

महिला आणि बालविकास खात्याने जारी केलेल्या या परिपत्रकाला काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत ॲड. हृदयनाथ शिरोडकर यांनी म्हटले आहे की, ‘अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून सरकारविरोधात प्रचार केला तर त्याचा जबर फटका आगामी निवडणुकांमध्ये बसेल. त्यामुळे सरकार घाबरले आहे आणि म्हणून वरील परिपत्रक जारी केले आहे. आमचा या परिपत्रकाला विरोध आहे. एका बाजूने खाते त्यांना स्वेच्छा कर्मचारी म्हणतात आणि दुसऱ्या बाजूने त्यांचा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी वापर करतात,’ असेही ते म्हणाले. 

‘अंगणवाडी कर्मचारी आणि हेल्पर यांना राजकीय बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी भाजपने बोलावले होते. त्यांना अशा बैठकांमध्ये सहभागी होता येते का, हा एक गंभीर प्रश्न आहे. खात्याचे संचालक सरकारच्या एजंटप्रमाणे काम करत आहे का?,’ असा सवालही शिरोडकर यांनी उपस्थित केला. खात्याने यावर स्पष्टीकरण द्यावे आणि जर खात्याकडे स्पष्टीकरण नसेल तर त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून त्यांना सरकारचे सर्व लाभ द्यावेत, अशी मागणी शिरोडकर यांनी केली. खात्याने काढलेल्या परिपत्रकाचा त्यांनी निषेध केला. खात्याचे संचालक आणि त्यांनी काढलेल्या परिपत्रकाच्या विरोधात कायदेशीर लढा देऊ, असेही ॲड. शिरोडकर म्हणाले.
 

Web Title: goa election 2022 if you preach you will lose your job strict instructions of goa govt to anganwadi employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.