Goa Election 2022 : तृणमूलला गुड बाय करत भाजपमध्ये प्रवेश, कळंगुटमध्ये जोझेफ सिक्वेरांना भाजपकडून उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 09:26 PM2022-01-25T21:26:11+5:302022-01-25T21:26:45+5:30
Goa Election 2022 : मायकल लोबोंशी देणार टक्कर. भाजपला लोबोंशी टक्कर देणारा प्रबळ उमेदवार कळंगुटमध्ये मिळत नव्हता. अखेर सिक्वेरा यांना पक्षाने गळाला लावले.
पणजी : कळंगुटमध्ये राजकारणाने वेगळे वळण घेतले असून जोझेफ सिक्वेरा हे आता भाजपचे उमेदवार असतील आणि मायकल लोबो यांच्याशी टक्कर देतील. भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याशी जोझेफ यांची सकाळी बैठक झाली आणि सायंकाळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जोझेफ हे काँग्रेस बंडखोर गटात होते. माजी आमदार आग्नेल फर्नांडिस तसेच ॲंथनी मिनेझिस यांच्याबरोबर काही दिवसांपूर्वीच त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने मायकल लोबो यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर केल्याने हे तिघेजण बरेच नाराज झाले होते.
याच नाराजीतून त्यांनी तृणमूलध्ये प्रवेश केला होता. परंतु आता आग्नेल व अँथनी या आपल्या साथीदारांना ठेंगा दाखवत जोझेफ यांनी तृणमूललाही बाय-बाय केले आहे. भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी आज सायंकाळी जाहीर होणार आहे. त्यात जोझेफ यांचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.
भाजपला लोबोंशी टक्कर देणारा प्रबळ उमेदवार कळंगुटमध्ये मिळत नव्हता. अखेर सिक्वेरा यांना पक्षाने गळाला लावले. जोझेफ यांनी २०१७ ची विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढविली होती. परंतु लोबो यांच्याकडून त्यांना ३८२८ मतांनी पराभव पत्करावा लागला होता. लोबो यांना भाजपच्या तिकिटावर त्यावेळी ११,१३६ तर जोझेफ यांना काँग्रेसच्या तिकिटावर ७,३११ मते मिळाली होती. येत्या निवडणुकीतही दोघे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतील, परंतु केवळ पक्षांची अदलाबदल असेल.
"पार्सेकर यांचे मन वळविण्याचे प्रयत्न चालूच"
दरम्यान, मांद्रे मतदारसंघात भाजपला सोडचिठ्ठी देऊन अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे मन वळवण्यासाठी भाजप नेत्यांनी प्रयत्न चालूच ठेवले आहेत. खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती देताना सांगितले की, ''पार्सेकर यांच्याशी आमची बोलणी अजून चालूच आहेत. त्यांनी निर्णय बदलावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि यात आम्हाला यश मिळेल याची खात्री आहे.''