Goa Election 2022 : भाजपमध्ये बंडाचा वणवा; उत्पल पर्रीकर अपक्ष लढणार, पार्सेकरांचाही लवकरच निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 08:36 AM2022-01-21T08:36:49+5:302022-01-21T08:38:08+5:30

दीपक पाऊसकर, सावित्री कवळेकर, उत्पल पर्रीकर, पार्सेकरांनी थोपटले दंड

Goa Election 2022 list declared manohar parrikar son utpal parrikar will fight independent former cm parsekar will decide soon | Goa Election 2022 : भाजपमध्ये बंडाचा वणवा; उत्पल पर्रीकर अपक्ष लढणार, पार्सेकरांचाही लवकरच निर्णय

Goa Election 2022 : भाजपमध्ये बंडाचा वणवा; उत्पल पर्रीकर अपक्ष लढणार, पार्सेकरांचाही लवकरच निर्णय

Next

पणजी : येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने  ३४ मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार काल जाहीर केले आणि पक्षात बंडखोरीचे स्फोट होण्यास आरंभ झाला. सावित्री कवळेकर, मंत्री दीपक पाऊसकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उत्पल मनोहर पर्रीकर आदींनी दंड थोपटणे सुरू केले. सावित्री व पाऊसकर यांनी तर थेट बंड केले आहे.

किमान आठ ठिकाणी उमेदवारांनी बंडाचा एल्गार केला आहे. अगधी तिखट प्रतिक्रिया व्यक्त करताना तत्काळ बंडाचे झेंडे दाखविण्यात  काणकोणचे इजिदोर फर्नांडिस यांचाही समावेश आहे. भाजप आणखी सहा मतदारसंघांमध्ये यापुढे उमेदवार जाहीर करील. मग तिथेही काही प्रमाणात बंड होणार आहे. ३४ पैकी काणकोण, सांगे, सावर्डे, मडकई, प्रियोळ, पणजी,  साळगाव, मांद्रे या ८ मतदारसंघात असंतोष आहे तर या ८ पैकी मडकई आणि मांद्रे वगळता ६ मतदारसंघातून बंडखोरीचे ऐलान झालेले आहे.

काणकोण मतदारसंघात आपल्याला डालवून रमेश तवडकर यांना उमेदवारी दिल्यास अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केलेले इजिदोर फर्नांडिस यांनी यादी जाहीर झाल्यानंतर त्याचा पुनरुच्चार केला आहे. तसेच भाजपमध्ये असून नसल्यासारखे असलेले विजय पै खोत यांनीही अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. 

सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांना नोकर भरतीतील कथित घोटाळा भोवला आहे. त्यांना उमेदवारी नाकारू गणेश गांवकर यांना दिल्यामुळे त्यांनीही अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. सावर्डेच्या शेजारील मतदारसंघ असलेल्या सांगेतही मागील कित्येक दिवसांपासून प्रचार कामात खपणाऱ्या सावित्री कवळेकर यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देऊन अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. 

पहिल्यांदाच मनोहर पर्रीकर कुटुंबीयांकडून पक्षाविरुद्ध बंडाचा झेंडा उभारण्यात आला आहे. पणजीत उमेदवारी नाकारलेले उत्पल पर्रीकर अपक्ष निवडणूक लढण्याच्या आपल्या निर्णयावर अजून कायम आहेत. त्यांना पणजीच्या बदलात देऊ केलेले डिचोली आणि सांताक्रूज मतदारसंघही त्यांनी नाकारले आहेत.      

मांद्रे, मडकईत ही असंतोष
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मांद्रे आणि मडकईतही संतोषाची ठिणकी पेटली. उमेदवारी नाकारल्यामुळे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना आपली नाराजी आणि संतापही लपविता आला नाही. त्यांना तातडीने आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. मडकईत डॉ. विद्या गावडे यांचे एकमेव नाव मडकई मंडल समितीने उमेदवारीसाठी पाठविले असतानाही ऐनवेळी मनोहर भिंगी यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे या मतदारसंघातही असंतोष खदखदतो आहे. परंतु बंडाचा निर्णय त्यांनी घेतलेला नव्हता.

पार्सेकर जाहीरनामा समिती अध्यक्षपद सोडणार
माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या समर्थकांची एक महत्त्वाची बैठक काल झाली. यात अनेक कार्यकर्त्यांनी पार्सेकर यांनी ही निवडणूक अपक्ष लढवावी, असा आग्रह धरला. याबाबत आपण येत्या तीन दिवसात निर्णय घेईन, तसेच आपण भाजप जाहीरनामा समिती अध्यक्षपदाचा राजीनामा तातडीने देईन, असे पार्सेकर यांनी यावेळी सांगितले. पक्षाने नव्हे तर काही व्यक्तींनी आपल्यावर अन्याय केल्याचेही ते यावेळी म्हणाले. आता मागून नव्हे तर संघटित होऊन निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.

सावित्री समर्थकांचे राजीनामे 
दरम्यान, सावित्री कवळेकर यांनी आपण सांगेत अपक्ष लढणारच असे काल जाहीर केले. त्यांच्या समर्थकांनी भाजपच्या पदांचे तसेच सदस्यत्वाचे काल राजीनामे दिले. सावित्रीने भाजपच्या महिला शाखेचे उपाध्यक्षपद सोडले. राणे कुटुंबाला दोन तिकिटे दिली जातात, मग आमच्यावरच अन्याय का अशी विचारणा सावित्रीने केली आहे.

उत्पल भाजप सोडणार, अपक्ष लढण्याचा निर्णय
पणजीतून उमेदवारी नाकारल्यामुळे बंड पुकारलेले उत्पल पर्रीकर यांची समजूत घालण्यासाठी पक्षाने त्यांना डिचोली किंवा सांताक्रुझ मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु त्यांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे. आपल्याला डिचोलीतून नव्हे तर पणजीतूनच लढायचे असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. ते म्हणाले, मला डिचोली किंवा अन्य कोणत्या मतदारसंघातून लढायचे नाही. कुठूनही केवळ आमदार झालो की पुरे अशी माझी भूमिका नाही. मी आमदारकीसाठी तळमळत नाही. मी पणजीतून लढण्याचा निर्णय घेतला आहे. माझे ठरले आहे, असे उत्पल पर्रीकर यांनी यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: Goa Election 2022 list declared manohar parrikar son utpal parrikar will fight independent former cm parsekar will decide soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.