Goa Election 2022 : "... त्यांनी कायम भाजप विरोधात काम केलं, गंभीर गुन्हेही"; उत्पल पर्रीकर यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 09:18 PM2022-01-27T21:18:25+5:302022-01-27T21:28:39+5:30
Goa Election 2022 : उत्पल पर्रीकर यांनी पणजीतून भरला अपक्ष उमेदवारी अर्ज.
Goa Election 2022 : गोव्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. येत्या काही दिवसांत मतदान प्रक्रियाही पार पडेल. सध्या गोव्यात उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांचं नाव खुप चर्चेत आहे. दरम्यान, उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय उत्पल पर्रीकर यांनी भाजपवर गंभीर आरोपही केले आहेत. भाजपनं पणजीतून ज्यांना उमेदवारी दिली आहे त्यांनी कायमच भाजपच्या विरोधात काम केल्याचा आरोप त्यांनी केला.
"भाजपनं यावेळी ज्यांच्या या क्षेत्रातून उमेदवारी जाहीर केली आहे, ते एक डिफॉल्टर आहेत. त्यांनी कायमच भाजपच्या विरोधात काम केलं. आमचं मतदार त्यांना मतदान करू इच्छित नाहीत. आमचे कार्यकर्तेही काम करू इच्छित नाहीत. त्यांच्याविरोधात बलात्कार आणि अन्य प्रकारचे गुन्हे दाखल आहेत," असं पर्रीकर म्हणाले. एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. मी ज्यावेळी पक्षाचा राजीनामा दिला तेव्हा या जागेवर चांगला उमेदवार देण्यास सांगितलं होतं, असंही ते म्हणाले.
"हा कठीण निर्णय"
निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उतरण्यावरही उत्पल पर्रीकर यांनी उत्तर दिलं. "माझ्यासाठी हा कठीण निर्णय होता. माझ्या वडिलांनी या विधानसभा क्षेत्रात काम करत पक्षाला मोठं केलं. जवळपास दोन दशकं ते इथे होते. ज्यांनी पक्षाला उभं करण्यास मदत केली त्या सर्व कार्यकर्त्यांसोबत माझे चांगले संबंध आहेत," असंही ते म्हणाले.
राजकारणात का आले?
तुम्ही राजकारणात प्रवेश करू नये असं वडिलांना वाटत होतं, असा सवाल त्यांना यावेळी करण्यात आला. "ज्यावेळी त्यांच्या विधानसभा क्षेत्रात काही चुकीचं होतंय हे मी पाहिलं तेव्हा कोणाला ना कोणाला त्या ठिकाणी उभं राहावं लागणार होतं. मी त्यांच्या मुलगा आहे म्हणून मी आज राजकारणात आलो. पक्ष मला संधी देईल असं वाटत होतं," असं उत्पल पर्रीकर म्हणाले. गेल्या वेळी मी निवडणूक लढवू शकलो असतो. पक्षाचे कार्यकर्तेही मला तसं करण्यास सांगत होते. परंतु मी पक्षासोबत उभा राहिलो, मी त्यावेळी स्वीकार केलं आणि मी काहीही म्हटलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.