Goa Election 2022 : उत्पल पर्रीकरांना ३-४ जागांची ऑफर दिली होती, लढले असते तर मोठे नेते झाले असते - प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 07:49 PM2022-02-03T19:49:40+5:302022-02-03T19:50:22+5:30
उत्पल पर्रीकर पणजी मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत.
Goa Election 2022 Utpal Parrikar: गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना पणजी मतदारसंघातून तिकीट नाकारलं होतं. भाजपने विद्यमान आमदार अतानासिओ मोन्सेरात यांना उमेदवारी जाहीर केली. तर उत्पल पर्रीकर यांनीही अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. अशा स्थितीत पणजीची जागेने भाजपपुढे उत्पल पर्रीकर यांचं आव्हान उभं केलं आहे. दरम्यान, उत्पल पर्रीकरांविषयी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोठं विधान केलं आहे.
"उत्पल पर्रीकर यांना ३-४ जागांची ऑफर देण्यात आली होती, त्यांनी एक जागा निवडायला हवी होती. आमच्या पक्षाच्या सर्वच नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यांना ज्या ३-४ जागांची ऑफर दिली होती, त्यांनी त्या जागेवर निवडणूक लढवायला हवी होती. जर त्यांनी निवडणूक लढवली असती तर ते मोठे नेते बनू शकले असते. ते पणजीच्या जागेवरून निवडणूक लढण्यासाठी का आग्रही होते, यात त्यांचे काय वैयक्तिक विचार होते याची मला कल्पना नाही," असं सावंत म्हणाले. गोव्यात इंडिया टुडेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी त्यांनी मॉन्सेरात यांच्यावरही भाष्य केलं. त्यांच्यावर अनेक केसेस आहेत, यासंदर्भात सावंत यांना प्रश्न विचारण्यात आला. "ते मनोहर पर्रीकर यांच्या सरकारमध्येही मंत्री होते. २००२ मध्येही सरकारात ते मंत्री होते. पणजीच्या जागेवर त्यांची चांगली पकड आहे आणि ते यावेळीही निवडणूक जिंकतील," असं त्यांनी नमूद केलं.
'... त्यावेळी निवडून दिलं नव्हतं'
भाजपनं गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या २५ टक्के उमेदवारांना उमेदवारी दिल्याचा प्रश्न सावंत यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, "आम्ही पोटनिवडणुकीत स्वच्छ प्रतिमा असलेल्यांना तिकीट दिलं होतं. परंतु त्यांना लोकांनी निवडून दिलं नाही. ट्रॅक रेकॉर्ड असल्यानं कोणी गुंड होत नाही. आता ते सुधरले असतील. तुम्ही पणजीच्या सामान्य जनतेला विचारून पाहा. ते लोकांच्यामध्ये कायम वावरतात. आपल्या लोकांसाठी कामं करतात. ते मोठ्या फरकानं जिंकून येतील. केस असल्याचा अर्थ ते गुन्हेगार आहेत असा होत नाही. प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे," असंही त्यांनी नमूद केलं.